कंडारी व महादेव माळ या दोन गावांमध्ये प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा
भुसावळ (प्रतिनिधी)- तालुक्यातील 23 गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या पाणीटंचाई कृती आराखड्यातून विहिर अधिग्रहण व विंधन विहिरी करून गावातील पाण्याची समस्या मार्गी लावण्यात आली आहे तर कंडारी व महादेव माळ येथे पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरीकांसह शेतकर्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. गतवर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील 23 गावांमध्ये भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून या गावांमधील पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी पाणीटंचाई कृती आराखड्यातून पाण्याची समस्या मार्गी लावण्यात आली होती. यामध्ये शिंदी, काहुरखेडा, कन्हाळे बुद्रुक, टहाकळी, किन्ही, गोंभी, खेडी-चोरवड, मोंढाळा, खंडाळे, मांडवेदिगर, भिलमळी या गावांमध्ये अधिग्रहण केलेल्या खाजगी विहिरीवरून पाणीपुरवठा केला जात आहे तर कन्हाळे बुद्रुक, कंडारी, फुलगाव, कठोरा खुर्द, कठोरा बुद्रुक, साकेगाव, अंजनसोंडे, पिंपळगाव खुर्द, तळवेल, वझरखेडा या गावांमध्ये विंधन विहिरींच्या माध्यमातून पाण्याची समस्या मार्गी लावण्यात आली आहे. दरम्यान, पावसाची विभागात प्रतीक्षा कायम आहे.
या गावातील कामे अपुर्ण
तालुक्यातील 35 पैकी साकरी दोन, बेलव्हाळ एक, काहुरखेडा दोन किन्ही एक आणि जोगलखेडा दोन अशा आठ विंधन विहिरींचे शिफारस अप्राप्त झाल्याने या गावातील विंधन विहीरींचे कामे अपुर्णावस्थेत आहेत. यामुळे या गावातील नागरीकांना काहीशा प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
नागरीकांना पावसाची प्रतीक्षा
कंडारी शिवारातील गोलाणी परीसर, साकरी फाटा, लाल जैन मंदीर परीसर आणि महादेव माळ (कुर्हे प्र.न.) या दोन गावांतील पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरीकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळत आहे मात्र पाणीपुरवठा सुरळीत व नियमित होवून पाण्याची समस्या मार्गी लागण्यासाठी नागरीकांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
सात विहिरींच्या खोलीकरणाला मंजुरी
खंडाळे एक, मोंढाळे एक, सुनसगाव दोन आणि कुर्हे प्र.न.तीन अशा सात विहिरींच्या खोलीकरणाला मान्यता मिळाली आहे मात्र केवळ खंडाळे येथील विहिर खोलीकरणाचे काम पुर्णत्वास आले असून या गावात पाणीपुरवठा सुरू झाला आहे तर मोंढाळे आणि सुनसगाव येथील विहिर खोलीकरणाचे काम प्रगतीपथावर असून कुर्हे प्र.न.येथील तीन विहीर खोलीकरणाचा पुर्तता अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले.
तातडीची पाणीपुरवठा योजना
शहराचे अविभाज्य अंग असलेल्या तुुकाराम नगर आदी भागातील वसाहतींचा समावेश भुसावळ ग्रामीणमध्ये येत असल्याने पालिका प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली नाही. यामुळे या भागात पाणीटंचाई कृती आराखड्यातून तातडीची पाणीपुरवठा कार्यान्वित करण्यात आली आहे.