नंदुरबार : असह्य वेदना सहन करत गरोदर मातेला गोळीत टाकून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या कुवलीडांबर परिसरातील या विदारक दृष्याने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे.
तळोदा तालुक्यातील कुवलीडांबर पाड्यावरील गरोदर माता विमल देवेंद्र वसावे या महिलेला असह्य अशा वेदना होऊ लागल्या. त्यामुळे औषध उपचारासाठी तीला तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागणार होते. परंतु कोयलीडांबर येथे वाहन पोहचू शकत नसल्याने नातेवाईकांनी बांबू लेन्स झोळीतुन कोयली डांबर ते रापापुर गावाजवळील नदीपर्यंत पायी प्रवास केला. तेथे सोमावल आरोग्य केंद्राने पाठवलेली रुग्णवाहिका तयार होती. त्या रुग्ण वाहिकेत टाकून त्या गरोदर मातेला तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आशा कर्मचारी रीना पाडवी व अंगणवाडी सेविकेच्या मदतीने गरोदर माता रुग्णालयात दाखल झाली. अजूनही अनेक कुटुंब डोंगर दऱ्यात राहत असल्याने त्या ठिकाणी वाहन पोहचू शकत नाही. खडतर रस्ते असल्याने पायी देखील चालता येत नाही. अशा प्रसंगी रुग्णाला झोळीत टाकून रस्त्यापर्यंत आणावे लागते.