नंदुरबार: चोर म्हणून हिणवल्याचा राग आल्याने 19 वर्षीय युवकाने चोर काय असतो ते दाखवून देण्यासाठी 1 लाख 19 हजारांच्या दागिन्यांची चोरी केली. घटनेनंतर या युवकाला पोलिसांनी चोवीस तासाच्या आत जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. दरम्यान, चोरीची घटना 10 जूनला घडली होती.
नवापूर तालुक्यातील बालाघाट येथील मलामजी मोत्या पाटील हा अमित निमा गावित या युवकाला नेहमी बांड म्हणून हिणवत होता. बांड हा आदिवासी शब्द असून, त्याचा अर्थ चोर असा होतो. वारंवार होणार्या अपमानाला कंटाळून अमितने खरोखरच चोरी करण्याचा निर्णय घेतला. त्याने मलामजी गावित यांच्या घराची भिंत तोडून 1 लाख 19 हजार रुपयांचे दागिने तसेच दहा हजार रुपये लंपास केले. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाला देण्यात आला. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या पथकाने 24 तासांत या चोरीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या चोरी प्रकरणी अमित निमा गावित याला पकडले. तो सारीपट नदीच्या जवळ असलेल्या काटेरी झुडपात बसला होता. त्याने चोरीची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे रवींद्र पाडवी, महेंद्र नगराळे, शांतिलाल पाटील, दादा वाघ, राकेश वसावे, जितेंद्र तोरवणे, दादा मासूळ आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
Next Post