भुसावळ : नाशिकजवळच्या लहावीत रेल्वे स्थानकाजवळ डाऊन पवन एक्स्प्रेसचे 11 डबे रेल्वे रूळावरून घसरल्याची घटना रविवारी दुपारी 3.10 वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातामुळे रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या रद्द केल्या होत्या तर अनेक गाड्यांच्या मार्गात बदल केले होते. दरम्यान, 24 तासांच्या अथक परीश्रमानंतर रेल्वे प्रशासनाने डाऊन रेल्वे लाईन पूर्ववत केली असून सोमवारी दुपारी 2.15 वाजेच्या सुमारास डाऊन मार्गावरील 11055 एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस धावल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने ट्विट करून दिली आहे.
वळणामुळे दुसरी लाइन सुरक्षित
रविवारी दुपारी जेथे अपघात झाला आहे, तेथील मार्ग वळणाचा आहे. यामुळे अप-डाऊन मार्गाच्या रुळांमध्ये अंतर आहे. याच ठिकाणी वळणावर पवन एक्स्प्रेसचा अपघात होऊन 11 डबे रुळांवरून घसरले. सुदैवाने अप लाईन काहीशी लांब असल्याने घसरलेले डबे त्या लाइनवर पडले नाहीत. अन्यथा दोन्ही मार्ग क्षतीग्रस्त होऊन वाहतूक विस्कळीत झाली असती.
55 मिनिटांपूर्वी गेली हावडा मेल
लहावीतजवळ त्या ठिकाणी रविवारी दुपारी 3.15 वाजता पवन एक्स्प्रेसचा अपघात झाला, त्याच्या 55 मिनिटे आधी या मार्गावरून डाउन मुंबई-हावडा मेल दुपारी 2.20 वाजता मार्गस्थ झाली. यानंतर पवन एक्स्प्रेस अपघातग्रस्त झाली.
अपघाताची होणार सखोल चौकशी
रेल्वे अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून त्यानंतर पवन एक्स्प्रेसच्या अपघाताची चौकशी होणार आहे त्यामुळे रेल्वे अपघाताचे कारण अपघाताच्या सखोल चौकशीनंतरच समोर येणार आहे मात्र रेल्वे रूळ देखभालीकडे झालेल्या दुर्लक्षानेच हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.
Updates:
Derailment of 11061.
Track safe and maintenance vehicles cleared from site to the nearest station.Time 2.15pm.
First train on down line 11055 LTT – Gorakhpur will pass site shortly.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) April 4, 2022