24 तास पाणी योजना राबविण्याची मागणी

0

पिंपरी-चिंचवड । प्रभाग क्रमांक तीनमधील चोवीसवाडी, वडमुखवाडी, बुर्डे वस्ती, पठारे मळा, मोशी, चर्‍होली, कोतवाल वस्तीमध्ये 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना राबविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका विनया तापकीर यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. महापालिकेतर्फे आठवड्यातील सातही दिवस चोवीस तास पाणीपुरवण्याचे नियोजन आहे. तर, काही विभागामध्ये याचे प्राथमिक कामदेखील सुरू झाले आहे. प्रभाग क्रमांक तीनमध्ये शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. शेतातील कामासांठी त्यांना शेतात जास्त वेळ थांबावे लागत आहे. तसेच या परिसरात मोठे गृहप्रकल्प झाल्यामुळे कामगारवर्ग, व्यापारी यांचीदेखील संख्या जास्त आहे. या नागरिकांना ठराविक वेळेत पाणी भरणे शक्य होत नाही. पाणीही कमी दाबाने येत आहे. त्यामुळे या प्रभागात 24 तास पाणी योजना राबविण्याची मागणी तापकीर यांनी केली आहे.