वरणगांव व परिसरात ” श्रीं ” चे विसर्जन शांततेत ( मिरवणूक प्रसंगी विज पुरवठा खंडीत – भक्तांमध्ये पसरली नाराजी )

वरणगांव । प्रतिनिधी

वरणगांव व परिसरात गुरुवारी श्री गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला ” पुढच्या वर्षी लवकर या ” अशा जयघोषात व वाजंत्रीच्या निनादात अखेरचा निरोप दिला यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले होते .यामुळे ” श्री ” विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली .

वरणगांव व परिसरात १०३ गणेश मंडळांनी भक्ती भावाने श्री गणरायाची स्थापना केली होती यामध्ये खाजगी – ७५ , सार्वजनिक २६ तर मानपूर व करंजी पाचदेवळी या दोन गावामध्ये एक गाव – एक गणपती अशा प्रकारे समावेश होता . या श्री गणरायाला गुरुवारी अखेरचा निरोप देण्यासाठी दुपारपासून सुरु झालेल्या विसर्जन मिरवणूकीला डिजे व वाजंत्रीच्या सुरुवात होवुन रात्री पुढच्या वर्षी लवकर या अशा गणेश भक्तांच्या जयघोषाने पूर्णविराम मिळाला . यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक आशिषकुमार आडसुळ यांनी चोख बंदोबस्तासह सर्व मिरवणूकीवर ड्रोन कॅमेर्‍याद्वारे नजर ठेवली होती . यामुळे शहर व परिसरात ” श्री ” विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली .

खंडीत विजपुरवठ्याने भक्तांमध्ये नाराजी
शहरातील बहुतांश सार्वजनिक मंडळांनी भव्य – दिव्य अशा गणेश मुर्तीची स्थापना केली होती . यामुळे विसर्जन मिरवणूकीच्या मुख्य मार्गावरील लोंबकणाऱ्या विज तारांमुळे परिसरातील विज पुरवठा खंडीत करण्यात आला होता . यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागल्याने विजवितरण कंपनीच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला . तसेच खंडीत विजपुरवठ्यामुळे विसर्जन मिरवणूकाही काही वेळ रेंगाळल्याने नवरात्र उत्सव काळात विज वितरण कंपनीने दक्षता घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

सेवा – भावी संस्थानी केले निर्माल्य संकलन
शहरातील सिव्हील सोसायटी व वरणगाव नगर परिषद तसेच निसर्ग चातक संस्थेच्या माध्यमातून शहर व हतनुर धरण येथे
घरोघरी स्थापन केलेल्या श्री गणेशमुर्ती व निर्माल्य संकलन केले . यामुळे नदीपात्रात होणारे प्रदुषण टाळण्यास मदत झाली .