या व्यक्तीच्या शरीरात आढळल्या 200 हून जास्त टाचण्या

0

मुंबई । गेल्या काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीच्या पोटातून केसांचा गोळा काढण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आता पुन्हा एक विचित्र समस्या असलेला रुग्ण मुंबईत दाखल झाला आहे. या रूग्णाच्या समस्येमुळे खुद्द डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. मुंबईत उपचारासाठी आलेल्या या व्यक्तीच्या शरीरात अनेक टाचण्यांचा दिसून आल्या आहेत. टाचण्यांची संख्या एक-दोन नव्हे, तर तब्बल 200 हून अधिक आहे. मुंबईतल्या जगजीवन राम रुग्णालयात आलेल्या या रुग्णावर उपचार करणे मुंबईतल्या डॉक्टरांपुढे एक मोठे आव्हान ठरले आहे. कारण शेकडो पिना त्याच्या शरीरात घर करून बसल्या आहेत. या पिना त्यांच्या पोटात आल्या कशा हे रुग्णाच्या कुटुंबीयांनाही माहिती नाही. एका मांत्रिकासोबत या रुग्णाचा संपर्क झाला होता. त्याच मांत्रिकाने एखाद्या खाद्यपदार्थात घालून या टाचण्या त्याच्या शरीरात घातल्याचा दावा केला जात आहे.

टाचण्या शरीरात कशा?
56 वर्षीय बद्रीलाल मीणा रेल्वेत पाणीपुरवठा कर्मचारी आहेत. मूळ राजस्थानच्या कोटा शहरात त्यांचे घर आहे. चार वर्षांपूर्वी त्यांना शूगरचा त्रास झाला. त्यानंतर पायावर हळूहळू जखमा व्हायला लागल्या. त्यामुळे बद्रीलाल यांचा एक्स-रे काढण्यात आला. पायापासून घशापर्यंत, हातापासून पाठीपर्यंत बद्रीलाल यांच्या शरीरात शेकडो टाचण्या आहेत. घशात रुतून बसलेल्या पिनांमुळे त्यांना बोलणे आणि खाणेही जिकीरीचे झाले आहे. बद्रीलाल यांच्यावर उपचार कसा करावा, असा प्रश्‍न डॉक्टरांना पडला आहे. त्यासोबतच इतक्या पिना नेमक्या शरीरात गेल्याच कशा, या प्रश्‍नानेही डॉक्टरांसह अनेक जण हैराण झाले.