साठवण बंधार्‍यातील असलेला गाळ मोफत घेवून जावे

0

जळगाव । राज्यातील धरणे व जलसाठ्यांच्या साठवण क्षमतेत वाढ व्हावी व शेतकर्‍यांच्या शेतीचा विकास व्हावा यासाठी राज्य शासनाने ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना अंमलात आणली आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना स्वखर्चाने आपल्या परिसरातील कोरडे झालेले तलाव, साठवण बंधारे, धरण आदीमधील गाळ वाहून नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. या अभियानाचा लाभ घेऊन शेतकर्‍यांनी धरणातील सुपिक गाळ आपल्या शेतीत टाकून आपल्या शेतीचा विकास करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांच्या अपर मुख्य सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधुन सुचना दिल्या. त्यानंतर लगेचच जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तूभ दिवेगावकर, जळगाव पाटबंधारे प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता सुरेंद सैंदानसिंग, जिल्हा परिषदेचे अति. मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जळगाव पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे, गिरणा पाटेबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी माने, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर.के.नाईक, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, जळगाव लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र विसवे, जळगाव मध्यमप्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील धरणे व त्यांची साठवण क्षमता, सध्याची पातळी, उपसा होऊ शकणारा गाळ, गाळ वाहून नेण्यासाठी शेतकर्‍यांना उपलब्ध करावयाच्या सुविधा यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील सध्या कोरडे असलेले पाझर तलाव, गाव तलाव, साठवण बंधारे यातील गाळ स्वखर्चाने काढण्यास शेतकर्‍यांना परवानगी देण्यात आली.