विक्रीकर कार्यालयासमोर ऑनलाईनविरोधात धरणे

0

जळगाव । विक्रीकर विभागाची ऑनलाईन विक्रीकर व इतर विवरणे भरण्याची व्यवस्था अनेक तांत्रिक अडचणींमुळे योग्यरित्या काम करीत नसल्याने आज सकाळी जळगाव येथे विक्रीकर कार्यालयासमोर लक्षवेधी सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहात जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ, जळगाव उद्योजक संघटना, विक्रीकर सल्लागार संघटना व जिल्हा अकाऊंटन्ट असोसिएशनचे प्रतिनिधी सहभागी झाले. यावेळी विक्रीकर आयुक्त (मुंबई) यांना देण्यासाठी निवेदन देण्यात आले.

ऑनलाईनमुळे यंत्रणा कुचकामी
निवेदन विक्रीकर सह आयुक्त दिपक भंडारे यांना देताना देताना टॅक्स प्रॅक्टीश्नर असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. एम. आर. शिरुडे, जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विजय काबरा यांच्यासह सीए अनिल शाह, सुरेश चिरमाडे, युसूफभाई मकरा, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते. विक्रीकर विभागाने बहुतांश कामांसाठी ऑन लाईन व्यवस्था केली आहे. मात्र, व्यवस्था नीट काम करीत नसल्याने कोणाला, किती किंमत मोजावी लागत आहे, याचे गंभीर परिणाम काय यावर विचार करणे आवश्यक आहे. विक्रीकर विभागाला 2014 मध्ये संगणीकरण करण्यासाठी पुरस्कार मिळाले आहेत. पण आता यंत्रणेत जे बदल अलिकडे केले आहेत यानंतरची परिस्थिती काय ? सध्या सर्व यंत्रणा कुचकामी आणि त्रासदायक झालेली आहे. नवीन बदल करताना सॅप सिस्टीम आणली. त्यामुळे व्यापारी व कर सल्लागारांना वाटले आता कामे पटापट व विनावलंब होतील. मात्र झाले आहे भलतेच. या सिस्टीमने याची उद्दिष्ट्ये निष्फळ केली आहेत. वरील सर्व अडचणी पाहून या ऑनलाईन व सॅप प्रणालित सुधारणा होणे आवश्यक आहे. ती होत नाही तोपर्यंत 2016-17 च्या तिसर्‍या तिमाहीची विवरण पत्रके भरण्याची मुदत निदान 30 जून 2017 पर्यंत वाढवू मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.