25 गुन्ह्यात वॉण्टेड कुविख्यात कुरेशी भावंडे अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात

अमळनेर : गुरे चोरी प्रकरणात तब्ब्ल 25 गुन्ह्यात वॉण्टेड असलेल्या दोघा कुरेशी भावंडांच्या मुसक्या आवळण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे. रशीद शफी कुरेशी व शकील शफी कुरेशी (मूळ रा. कसाली मोहल्ला, अमळनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
जळगाव जिल्ह्यातील अमळनेरसह चाळीसगाव, पारोळा, चोपडा, धरणगाव आदी ठिकाणी साथीदारांच्या मदतीने चारचाकीद्वारे गुरे चोरण्यात रशीद शफी कुरेशी व शकील शफी कुरेशी (मूळ रा. कसाली मोहल्ला अमळनेर, हमु मालेगाव) यांची मुख्य भूमिका होती शिवाय अमळनेरच्या चार गुन्ह्यांमध्ये आरोपी वॉन्टेड असल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध स्टँडिंग वॉरंट काढले होते. रशीदने मालेगावला पाचव्यांदा विवाह केल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळताच त्यांनी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील, मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे यांना मालेगाव येथे पाठवले. रशीद याला माळदे येथील गुलाब बाबा दर्गा परीसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले तर खाक्या दाखवताच त्याने शकील रविवार, 22 रोजी चोपडा येथून बसने मालेगाव येणार असल्याची माहिती देताच त्याच्याही अमळनेर बसस्थानकावरून मुसक्या आवळण्यात आल्या.