25 जूनलाच मिळाली होती अमरनाथ हल्ल्याची माहिती

0

श्रीनगर । अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन निघालेली बस जर ठरलेल्या वेळेत हायवेवरून गेली असती तर दहशतवादी हल्ला टाळता आला असता. हल्ल्याची इंटेलिजन्स वॉर्निंग 15 दिवसांपूर्वीच मिळाली होती. मात्र ती गांभीर्याने घेतली गेली नाही. गुप्तचर यंत्रणांनी जम्मू-काश्मीर प्रशासनाला 25 जूनलाच संभाव्या धोक्याबद्दल अलर्ट केले होते. सायंकाळच्या वेळी यात्रेकरूंच्या बसला प्रवास करण्यास मनाई केली असती, तर हा हल्ला रोखता आला असता. या अलर्टचे स्पष्टीकरण जम्मू-काश्मीर पोलीस महानिरीक्षक (काश्मीर झोन) मुनीर खान यांनी हरयाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या अधिकार्‍यांसमोर दिले होते. याच राज्यातून मोठ्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेसाठी जातात.

सुरक्षा यंत्रणांना दिलेली माहिती
25 जूनला चंदीगडमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि आयबीच्या अधिकार्‍यांची मल्टी एजन्सी समन्वय बैठक झाली होती. या बैठकीत अमरनाथ यात्रेकरूंवर संभाव्य हल्ल्याचे इनपुट देण्यात आले होते. अनंतनागच्या एसएसपींकडून मिळालेल्या इनपुट्सनुसार, दहशतवाद्यांना त्यांच्या म्होरक्यांकडून 100 ते 150 यात्रेकरू आणि 100 पोलीस अधिकार्‍यांना ठार करण्याचे आदेश मिळाले आहेत. याव्यतिरिक्त यात्रेकरूंच्या ताफ्यावर हल्ला करून संपूर्ण देशात सामाजिक दंगे घडवून आणण्याचादेखील कट असू शकतो, असे या अलर्टमध्ये नमूद होते.