25 साठवणूक टाक्यांसाठी जागाच नाही

0

पुणे । समान पाणीपुरवठा योजनेला मान्यता मिळाल्यानंतर 15 दिवसांत काम सुरू करण्याचे जाहीर करणार्‍या महापालिका प्रशासनाला पाण्याच्या साठवणूक टाक्यांसाठी जागा शोधण्यात अडचणी येत आहेत. प्रस्तावित 82 टाक्यांपैकी 25 साठवणूक टाक्यांची उभारणी करण्यासाठी आवश्यक जागा प्रशासनाच्या ताब्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करण्यातही अडचण येत आहे. साठवणूक टाक्यांच्या उभारणीसाठी जागा ताब्यात नसतानाही योजनेचा घाट घालण्यात आल्याच्या आरोपांनाही त्यामुळे पुष्टी मिळाली आहे.

काम रखडल्याची वस्तुस्थिती पुढे आली
शहराची भौगोलिक रचना, असमान पाणीपुवठा, पाणी वितरणातील त्रुटींबरोबरच गळती रोखण्यासाठी समान पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली होती. शहराचा चेहरा-मोहरा बदलणारी ही महत्त्वाकांक्षी योजना मात्र प्रारंभीपासूनच वादात सापडली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी पाण्याच्या टाक्यांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र त्यामध्ये अनियमितता झाल्यामुळे राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने या कामांना स्थगिती दिली होती. विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित झाला होता. साठवणूक टाक्यांसाठी जागा ताब्यात आल्या नसतानाही उद्घाटनाचा घाट घालण्यात आल्याचे आरोपही महापालिका प्रशासनावर झाले होते. त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आग्रही भूमिका घेत या योजनेला गती देण्याचा प्रयत्न केला. स्थायी समितीनेही मार्च महिन्यात या योजनेला मान्यता दिली. त्यावेळी पंधरा दिवसांमध्ये हे काम सुरू होईल, असा दावा स्थायी समिती आणि तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केला होता. प्रत्यक्षात दोन महिन्यानंतरही या योजनेचे काम सुरू झाले नसल्याचे आणि पाण्याच्या साठवणूक टाक्या उभारण्यासाठी जागेचा प्रश्‍न निर्माण झाल्यामुळेच हे काम रखडल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे.

20 हजार चौरस फूट जागेची आवश्यकता
या योजनेअंतर्गत शहराच्या विविध भागांत 82 साठवणूक टाक्या उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. यातील काही साठवणूक टाक्या अस्तित्वात आहेत. मात्र अद्यापही 25 टाक्यांच्या उभारणीसाठी जागेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. टाक्यांसाठी भूसंपादनाचा तिढा सुटला नसल्यामुळे हे काम दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांकडून देण्यात आली. त्यामुळे दिवाळीनंतरच या योजनेच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. योजनेअंतर्गत साठवणूक टाक्यांची उभारणी करण्यासाठी 20 हजार चौरस फूट एवढ्या जागेची आवश्यकता आहे. टाकी उभारणीच्या कामाला किमान आठ महिन्यांचा कालावधी लागतो.