धुळे : भावंडामधील वाटणी प्रकरणी शिंदखेडा तहसीलदारांकडे पाठवण्यासाठी 25 हजारांची लाच मागणार्या अमळथे तलाठ्यास धुळे एसीबीच्या पथकाने शिंदखेडा तहसील आवारात लाच स्वीकारताच अटक केल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली. नवनीत खंडेराव पाटील (32, रा.शिरपूर, जि.धुळे) असे अटकेतील तलाठी तर संतोष रमेश भदाणे (36, अमळथे, ता.शिंदखेडा, जि. धुळे) खाजगी इसमाचे नाव आहे.
वाटणी प्रकरणासाठी मागितली लाच
44 वर्षीय तक्रारदार यांची मौजे आच्छी येथील आई व वडीलांचे नावे असलेली शेत जमिनीचे तक्रारदार यांच्या भावंडांमध्ये वाटणी प्रकरण तयार करून तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे प्रकरण पाठवण्यासाठी आरोपी तलाठी नवनीत पाटील यांनी 15 रोजी 40 हजारांची लाच मागितली मात्र त्यात 25 हजार रुपयात तडजोड करण्यात आल्यानंतर तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली व त्यानंतर सापळा रचण्यात आला. शिंदखेडा तहसीलच्या आवारात आरोपींनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. आरोपींविरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, कृष्णकांत वाडीले, राजन कदम, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, चालक सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.