धुळे : शेतजमीन प्रकरणातील चौकशी अहवाल धुळे जिल्हाधिकार्यांना पाठवण्यासाठी 25 हजारांची लाच मागणी केल्याप्रकरणी पिंपळनेर, ता.साक्री येथील नायब तहसीलदारांच्या अंगलट आली असून त्यांच्यासह खाजगी पंटराला धुळे एसीबीच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. विनायक सखाराम थवील असे नायब तहसीलदारांचे तर संदीप मुसळे असे खाजगी पंटराचे नाव आहे. या कारवाईने लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.
25 हजारांची लाच मागणी भोवली
तक्रारदार हे पिंपळनेरचे रहिवासी आहेत. त्यांनी मौजे ठोलीपाडा येथे नवीन अविभाज्य शर्तीच्या शेत जमिनीचा खरेदीचा व्यवहार रजिस्टर सौदा पावतीने केला आहे. या शेतजमिनीवर भोगवटादार वर्ग-1 होण्यासाठी शेतजमीन मालकाने 23 सप्टेंबर 2021 रोजी नायब तहसीलदार विनायक थवील यांच्याकडे अर्ज केला होता व थवील यांनी 4 मे 2022 रोजी या प्रकरणात 7/12 उतारे व नोंदी सादर केल्या नसल्याचे कारण दर्शवत हे प्रकरण तूर्तास निकाली काढले मात्र तक्रारदार यांनी या प्रकरणातील कागदपत्राची पूर्तता करून वेळोवेळी नायब तहसीलदार विनायक थवील यांची भेट घेतली. या प्रकरणांचा चौकशी अहवाल धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे थवील यांनी 25 हजारांची मागणी केली होत व तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर ट्रॅप लावण्यात आला मात्र थवील यांना संशय आल्याने त्यांनी बुधवार, 8 जून 2022 लाच स्वीकारली नाही मात्र एसीबीला लाच मागणी अहवाल प्राप्त होताच त्यांनी खाजगी पंटरासह नायब तहसीलदारांना अटक केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, कैलास जोहरे,, भुषण खलाणेकर, गायत्री पाटील, भुषण शेटे संदीप कदम, संतोष पावरा, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.