जळगाव। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी 25 कोटी रूपये निधी उपलब्ध करून दिला. या निधीवरून मात्र सत्ताधारी, भाजपा, यांच्यात कामांची यादी बनविण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु संपूर्ण शहराचा विकासाचा ध्यास घेऊन नगरसेवक कैलास सोनवणे यांनी शहराचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी या निधीमधून संपूर्ण शहराचा विकास कसा होईल याबाबत आराखडा व यादी तयार केली आहे.
जिल्हाधिकार्यांकडून साकारात्मक प्रतिसाद कामे होण्याची अपेक्षा
अमृत योजनेंतर्गत शहरात काम सुरू होणार असल्याने शहरात कोठेही रस्त्यांची कामे करण्यात येवू नये, असे नगरविकास विभागाच्या राज्याच्या सचिव मनिषा म्हसकर यांनी आयुक्तांना कळविले आहे. त्यामुळे 25 कोटीच्या निधीमधून शहरातील अत्यावश्यक पाणीपुरवठा योजनेत बदल शहरात एलईडी पथदिवे, पालिकेचे दवाखाने यासह इतर मूलभूत सुखसुविधा उपलब्ध करून देणेबाबत जिल्हाधिकार्यांना पत्र दिले आहे. त्या पत्राच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आज जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची भेट घेऊन शहर विकासाच्या ब्ल्युप्रिंटवर आणि प्रशासनाने सुचविलेल्या मागण्यांबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात सकारात्मकता दर्शविली आहे. नागरिकांच्या आवश्यक प्रश्नांवर या निधीमधून खर्च व्हावा, अशी अपेक्षा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.