जळगाव । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौर्यांवर असतांना त्यांनी शहरासाठी 25 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या 25 कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील विविध कामे घेण्यात आली आहेत. परंतू मंजूर निधीचे काम करणार कोण यात वाद सूर असतांना आज महापालिकेच्या खात्यात हे पैसे जमा झाले असून महानगर पालिका हे कामे करणार आहे. या कामांचा विकास आराखडा तयार करून तो कामांच्या बाबत गठीत तयार केलेल्या समितीला दिला जाणार आहे. त्यानंतर एजन्सी नेमून कामांना सुरवात होणार आहे अशी माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षेतखाली समिती
महानगरपालिकेचे आर्थिकस्थिती बिकट असल्यामुळे विकास कामांकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 कोटीचा निधी जाहीर केल्यानंतर मंजुरीचे पत्र प्रशासनाला प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या 25 कोटीच्या निधीतून विकासकामे करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. पालकमंत्री पाटील हे 21 मार्चला जिल्हा दौर्यावर आले असता 25 कोटी रुपयाच्या निधीतून विकासकामे करण्यासाठी निधीचे विभाजन करण्यात आले.
असा होणार निधी खर्च
एलएडी पथदिव्यांसाठी 10 कोटी, गटारींसाठी 7 कोटी, भूमिगत केबल टाकण्यासाठी 3 कोटी आणि नाल्याच्या काठावर संरक्षण भिंत बांधण्यासाठी 4 कोटी असे एकूण 25 कोटीच्या निधीचे विभाजन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी या सर्व कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे पत्र तसे मनपाला दिले होते. शहरात 10 कोटीचे पथदिव्यांवर एलईडी लाईट बसविले जाणार आहे. त्यामुळे मनपाला दरवर्षी विजबिलापोटी द्यावे लागणारे दोन कोटी वाचणार आहे. हा निधी इतर कामांसाठी वापरला जावू शकतो असे आयुक्त सोनवणे यांनी सांगितले
अखेर वादावर पडदा
त्यानुसार मनपाकडून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू होते. पण त्यातही हे कामे मंजूर असली तरी हे कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करणार की महापालिका करणार यामध्ये वाद होता. परंतू आज महापालिकेच्या खात्यात हे पैसे जिल्ह्याधीकारी कार्यालयाकडून वर्ग झाले असून त्वरीत कामांचे अंदाजपत्रक तयार करून ते समितीपुढे दिले जाणार आहे. या निधीतून 7 कोटीमधून गटारींचे कामे मंजूर केली आहे. त्यात शहरातील 37 प्रभागांमधील नव्याने वसाहती झालेल्या भागात 230 गटारी बांधल्या जाणार आहे.