जळगाव । आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले होते. त्यात एकुण 3 हजार 660 अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जावर सोडत प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या फेरीत जिल्ह्यातील 2 हजार 356 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. सोडतमध्ये ज्या बालकांचा नंबर लागला आहे. त्यांच्या पालकांना एस.एम.एस. पाठविण्यात आले आहे. सोडतनंतर एनआयसीकडून 16 मार्च पर्यत प्रवेश घेण्याची मुदत देण्यात आली आहे. 7 मार्च रोजी पालकांना प्रवेश प्रक्रियेत निवड झाल्याचे एस.एम.एस.पाठविण्यात आले असून आठ दिवसात जर प्रवेश घेतल नाही तर प्रवेश रद्द होणार आहे. तसेच शाळांकडून देखील पालक शाळेत अॅडमिशनसाठी न आल्याने नॉट अॅप्रोच असा शेरा एनआयसीला कळवणार आहे. त्यामुळे पालकांकडून कागदपत्राबाबत जुळवाजुळव सुरु करण्यात आली आहे.
256 शाळेत पहिली तर 6 शाळेत नर्सरी प्रवेश
आर.टी.ई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 25 टक्के अंतर्गत मोफत प्रवेशासाठी सोडत प्रक्रिया नुकतीच पार पडली होती. यामधुन काढण्यात आलेल्या शाळांचे सांकेतिक क्रमांक पुणे येथील एन.आ.सी.विभागाकडे पाठविण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातील 3 हजार 660 जागांसाठी 3 हजार 671 अर्ज आले होते. यात जिल्ह्यातील 262 शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार आहे. वैध ठरलेल्या अर्जापैकी पहिल्या फेरीत 2 हजार 336 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. 262 शाळांपैकी 256 शाळा या पहिलीत प्रवेशासाठी तर 6 शाळांमध्ये नर्सरीच्या विद्यार्थ्याना प्रवेश दिला जाणार आहे. पहिलीसाठी 3 हजार 577 तर नर्सरीसाठी 83 जागा आहेत. पहिल्या टप्प्याचे अॅडमिशन पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत प्रवेश दुसर्या टप्प्यात लवकरच दिले जाणार आहे. दुसर्या टप्प्यात निवड झाल्यास पालकांना एस.एम.एस.द्वारे कळविण्यात येणार आहे.