भुसावळ । पालिकेने मंगळवारपासून शहरातील अतिक्रमण हटावो मोहिमेला प्रारंभ करताच अतिक्रमितांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. 200 कर्मचारी, 60 पोलिसांचा बंदोबस्त तर तीन जेसीबी, आठ ट्रॅक्टर असा ताफा यावल रोडवर सकाळी 7.30 वाजता धडकल्यानंतर अतिक्रमितांमध्ये चांगलीच भंबेरी उडाली. पालिका मंगळवारपासून मोहिम राबवणार असल्याचे सोमवारी रात्री निश्चित झाल्याचा सुगावा अतिक्रमण करणार्यांना लागल्याने त्यांनी मध्यरात्री पत्री शेड, टपर्या तसेच अन्य अतिक्रमण रातोरात हटवून पालिका प्रशासनाला आश्चर्याचा धक्का दिला. पालिकेने केलेल्या सर्वेमध्ये 750 अतिक्रमित टपर्या असल्यातरी प्रत्यक्षात जामनेर रोडवर पालिकेला एकही टपरी काढावयास मिळाली नाही, हे विशेष!
यावल रस्त्याने घेतला मोकळा श्वास
राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते सेंट अलॉयसीस शाळेपर्यंतच्या रस्त्यावरील टपर्या मध्यरात्रीच गायब झाल्या. गांधी पुतळ्यापासून जळगाव रोडवरील डॉ.तुषार पाटील यांच्या दवाखान्यापर्यंतचे अतिक्रमण मात्र हटवण्यात आले तर कुलकर्णी प्लॉट भागात गेल्या 10 वर्षांपासून अधिक काळापासून असलेले माजी नगरसेवक मधु तुटे यांचे गोदावरी टेंट हाऊसचे अतिक्रमणही हटवण्यात आले. तुटे यांनी मंडप-टेंट व्यवसायासाठी चक्क पालिकचा रस्ता बंद करून भव्य शेड उभारले होते. ते हटवण्यात आले.
अतिक्रमण मोहिम ठरली टाय टाय फीस…!
लाखो रुपये भरून घेतलेला पोलीस बंदोबस्त घेऊन मंगळवारी सुरू झालेली मोहिम टाय टाय फीस ठरली. 25 टपर्या, चार पक्की घरे, चार मोठे शेड, 18 ओटे, नऊ पायर्या दिवसभर मोहिमेत हटवण्यात आल्या. पालिकेच्या मोहिमेपूर्वीच टपर्या, शेड हटवण्यात आले.
नितीन धांडे यांची जीमही तोडली
अष्टभूजा मंदिराजवळ उभारलेली नितीन धांडे यांची जीमही पथकाने तोडली. यावेळी उभयतांमध्ये काहीसा शाब्दीक वाद झाला मात्र सामोपचाराने तोडगा निघून सर्वांचे अतिक्रमण तोडले जात असल्याची भूमिका मुख्याधिकार्यांनी मांडल्यानंतर अतिक्रमित जीमही तोडण्यात आली.
गोपाळनगरात सर्वाधिक अतिक्रमण
शहरातील गोपाळ नगर भागात सर्वाधिक अतिक्रमण असल्याचे पालिकेच्या पथकाला दिसून आले. या भागातील पालिकेच्या मोकळ्या जागेसह अन्य भागातील अतिक्रमण जेसीबी मशीनद्वारे हटवण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात तक्रारी केल्या जात होत्या. अखेर हे अतिक्रमण हटवण्यात आल्याने या भागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
गरूड प्लॉट भागातील दत्ता राणेंच्या अतिक्रमणाला अभय !
शहरातील गरूड प्लॉट भागातील दत्ता राणे नामक इसमाच्या घराबाहेर असलेले अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेचे पथक पोहोचले मात्र हे अतिक्रमण न हटवताच पथक परतल्याने पालिकेच्या पारदर्शक मोहिमेवरच शंका उपस्थित केली जात आहे. मुळातच रहदारीचा रस्ता अडवून तार कम्पाऊंड बांधण्यात आले आहे. असे पालिकेच्या पथकासह मुख्याधिकार्यांनी पाहून न पाहिल्यासारख केल्याने एकूणच पालिकेच्या मोहिमेविषयी शंका उपस्थित होत आहे. हे अतिक्रमण हटू नये यासाठी एका पदाधिकार्याचादेखील दूरध्वनी आल्याची चर्चा आहे. मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी मात्र आरोप फेटाळून लावत लवकरच या भागात नऊ मीटरचा रस्ता केला जात असल्याने रहिवाशांना नोटीस देऊन पट्टे मारून या भागातील अतिक्रमण हटवण्यात येईल, असे तयांनी सांगितले.
पालिकेचे फुटपाथ झाले मोकळे
मंगळवारी दुपारनंतर पालिकेच्या पथकाने जामनेर रोडवर अतिक्रमण निर्मूलनास प्रारंभ केला. पालिकेच्या रस्त्यांपर्यंत व्यावसायिकांनी बांधलेले ओटे तोडण्यात आले शिवाय दुकानांचे बोर्ड, वेदर शेड आदीही काढण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायिकांनी पालिकेचे फुटपाथ अडवून त्यावर साहित्य ठेवले होते शिवाय स्वतःच्या फायद्यासाठी तेथे जाळ्या बसवून नागरिकांना वापर बंद करण्यात आला होता. मोहिमेदरम्यान मात्र हे अतिक्रमण हटवून फुटपाथ मोकळे करण्यात आले आहेत.
जनता गॅलरीचे बांधकाम आज तुटणार !
शहरातील जनता गॅलरीचे वादग्रस्त बांधकाम बुधवारी तुटण्याची शक्यता आहे. या बांधकामावरून अनेकदा संघर्ष निर्माण होवून प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले होते. अखेर तक्रारदाराने सुप्रीम कोर्टात धाव घेतली व अतिक्रमण तोडण्याचे आदेश प्राप्त झाले. तोडण्यात येणार्या बांधकामाच्या जागेवर पालिकेच्या पथकाने मार्किंग केली आहे. बुधवारी हे बांधकाम तोडण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकार्यांनी दिली.
मोहिमेत हे सहभागी
मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांच्या नेतृत्वात सकाळी साडेसात वाजेच्या
सुमारास अतिक्रमण हटाव मोहिम सुरू झाली. तीन जेसीबी, आठ ट्रॅक्टर, 200 कर्मचारी तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, पोलीस निरीक्षक मारोती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली 60 पोलीस कर्मचार्यांसह ईआरटीचे विशेष पथक सहभागी झाले.
गुन्हा होईल दाखल…
पालिकेने 2016 मध्ये अतिक्रमण हटाव मोहिम राबवून रस्ते मोकळे केले मात्र वर्षभरातच पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती झाली. ते चित्र यंदा पुन्हा न होण्यासाठी दहा अधिकारी, कर्मचार्यांचे पथक मोहिम संपल्यानंतर ज्या-ज्या भागात कुणी टपर्या वा अतिक्रमण करीत असेल तर त्यांचा सर्वे करून लागलीच दुसर्या दिवशी अतिक्रमण हटवणार आहे शिवाय संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती, मुख्याधिकार्यांनी दिली.