25 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आयुक्त डांगे दाखल

0

जळगाव । शहरात 2 मे रोजी प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्याजागी नियमीत आयुक्त म्हणून ठाण्याचे अतिरिक्त आदिवासी आयुक्त सी. के. डांगे यांची बदली करण्यात आली. मात्र, त्यांनी 20 ते 22 दिवसानंतरही पदभार न स्विकारल्याने पालिका वर्तुळात ते महापालिकेचा पदभार स्वीकारण्यास अनुत्सुक असल्याचे बोलले जात होते. अशा अनिश्‍चितीच्या काळात अखेर रविवार 27 मे रोजी श्री. सी. के. डांगे शहरात दाखल झाले. त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी केले.

दहा महिन्यांपासून प्रभारी आयुक्त
तत्कालीन आयुक्त जीवन सोनवणे 30 जुलै 2017 रोजी सेवानिवृत्त झाले. सोनवणे यांच्यानंतर कुठल्याही अधिकार्‍यांची येथे बदली न झाल्याने हे पद रिक्तच होते. जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला होता. दहा महिन्यांपासून निंबाळकर हेच प्रभारी आयुक्त म्हणून काम पाहत होते. सरकारने जळगाव महापालिकेचे आयुक्त म्हणून ठाणे आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत डांगे यांची बदली 2 मे रोजी केली होती. श्री. डांगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ते सोमवारी पदभार स्विकारणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, श्री. डांगे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच महापालिकेच्या सर्व विभागांची अहवाल त्यांनी मागविला होता. यासंदर्भांत सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागाचा अहवाल शुक्रवारीच तयार ठेवला आहे.