मुंबई । युुवा सेना अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील सर्व नगरसेवकांची महापालिका मुख्यालयात तातडीची बैठक घेऊन त्यांना 25 मार्चपर्यंत मुंबईतून बाहेर न पडण्याचे निर्देश दिले. मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे निर्देश दिल्याचे समजते. मुंबई महापालिका मुख्यालयात शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना सोमवारी सकाळी 9 वाजता उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्व नगरसेवक उपस्थित राहिल्यानंतर आदित्य यांनी सिनेट निवडणुकीसह अन्य मुद्द्यावर मार्गदर्शन केले. सिनेट निवडणूक आदित्य यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्यामुळे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना नगरसेवक यांच्यावरही या निवडणुकीची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 25 तारखेपर्यंत शिवसेना नगरसेवकांनी डोळ्यात तेल घालून काम करावे. मतदारांना बाहेर काढण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करा, असे आवाहन आदित्य यांनी केल्याचे समजते.
मेहनत घ्यायला हवी!
या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मोठ्या ताकदीने उतरली आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणा कामाला लावून ते निवडणूक लढवतील. म्हणून या निवडणुकीसाठी शिवसेना आणि युवा सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यायला हवी. रामनवमीसह इतर सणानिमित्त अनेक नगरसेवक गावी किंवा अन्य ठिकणी जात असतात. त्यामुळे यंदा कुणीही 25 तारखेपर्यंत मुंबईबाहेर जाण्याचा विचार न करून या निवडणुकीच्या कामाला झोकून द्यावे, असे आवाहन ठाकरे यांनी केल्याचे समजत आहे. सिनेट निवडणुकीसाठी युवा सेनेचे 10 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
या निवडणुकीत युवा सेनेचे साईनाथ दुर्गे यांचा अर्ज बाद झाल्याने निखिल यशवंत जाधव याला आता युवा सेनेच्या पॅनेलमध्ये घेण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी सुमारे 62 हजार 500 सदस्यांची नोंदणी झाली आहे. सर्वाधिक नोंदणी युवा सेनेची असल्याने त्यांचे पारडे जड आहे. मागील निवडणुकीत युवा सेनेचे 10 पैकी 8 सदस्य निवडून आले होते. यंदा दहाच्या दहा जागा निवडून आणण्याचा निर्धार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.