25 लाखांचा खैरसाठा जप्त

0

नवापूर । तालुक्यातील खांडबारा परिसरातील वागदा गावातील राजू वसावे यांच्या शेतात ताडपत्रीत लपवलेला 25 लाख रुपये किंमतीचा खैर लाकडाचा साठा वनविभाग व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत जप्त केला. यात 25 घनमीटर खैर लाकूड आहे. या लाकडाची किंमत लाखोंच्या घरात असून याप्रकरणी नवापूर वन विभागाकडून पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली असून खांडबारा परिसरात पहिल्यांदाच अशी मोठी कारवाई झाली आहे. खैर लाकडाची तस्करी करणारे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तपास करत आहेत. लवकरच हे रॅकेट उद्ध्वस्त केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खबर्‍याकडून मिळाली माहिती
वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील डांग, व्यारा जिल्ह्यातील जंगलातून खैर लाकडाची अवैध तोडणी करून नवापूर तालुक्यातील अनेक भागात त्याची साठवण केली जाते. यासंदर्भात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने सोमवारी संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. खैर लाकडांची अवैध वाहतूक हरियाणा, दिल्ली, पंजाब, राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. खैर लाकडापासून पान मसाल्याचा काथा व गुटखा तयार केला जातो. याप्रकरणी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी संशयित राजू वसावे याला अटक केली आहे. गुजरात पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

तस्करांचे धाबे दणाणले
वनविभाग व पोलीस प्रशासन यांनी एकत्र येत संयुक्तरीत्या ही धडक कारवाई केली. या कारवाईमुळे वन संपदेची तस्करी करणार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. खांडबारा परिसरातून खैर लाकूड आणण्यासाठी 1 आयशर, 3 पीकअप व 1 ट्रॅक्टर अशा एकूण पाच गाड्या वागदे गावातून वन विभाग व विसरवाडी पोलीस यांनी संयुक्तरीत्या कार्यवाही करत जप्त केल्या. वन विभागाचे उप वनसरंक्षक एस.बी. केवटे, सहाय्यक वन संरक्षक नंदुरबार, जी.आर. रणदिवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, चिंचपाडा वनक्षेत्रपाल आर.बी. पवार, नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, चिंचपाडा वनक्षेत्रपाल जी.बी. भामरे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक देवीदास बिर्‍हाडे, नवापूर, खांडबारा, चिंचपाडा, नंदुरबार येथील वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या ही कार्यवाही केली.

कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
यावर्षी खैर, सागवान व इतर लाकूड चोरीतील अवैध वाहतुकीबाबत ट्रक, टेम्पो, पिकअप, इतर गाड्या अशी 15 वाहने सरकार दप्तरी जप्त करण्यात आली आहेत. वेगवेगळ्या कारवाईत वन आगारात कोट्यवधी रूपयांचे अवैध लाकूड जप्त करण्यात आले आहे. वन संपदेची तस्करी करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नंदुरबारचे उप विभागीय वनाधिकारी गणेश रणदिवे यांनी दिली.

वन कायद्याने गुन्हा दाखल
जप्त केलेला मुद्देमाल हा नवापूर डेपोत सुरक्षित ठेवण्यात आला आहे. भारतीय वन अधिनियम 1927 कलम, 26, 41, 42, 52 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई मुख्य वनरक्षक टी. राज साळुंखे धुळे, उपसंरक्षक एस.बी. केवटे, विभागीय वन अधिकारी (दक्षता, धुळे), उमेश वावरे, उप विभागीय वन अधिकारी गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.