25 वर्षानंतर प्रथमच चाळीसगाव तालुक्यातील सजांची पुनर्रचना

0

चाळीसगाव। तलाठी हा महसूल प्रशासन आणि जनता यांच्यातील दुवा. उत्;पन्नाचा दाखला असो, 7/12 उतारे असो, शेतीच्या नोंदी असो की निराधारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे असो जनतेचा तलाठ्यांची संपर्क ठेवावा लागतो. त्याच्यात गावातील तलाठ्यांची सजा दुसर्‍या गावात असली म्हणजे बर्‍याचदा खूप अडचणीचे ठरते. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळापासून चाळीसगाव तालुक्यातील तलाठी सजांची रचना व नवीन सजांची निर्मिती झालेली नव्हती. त्यामुळे नागरिकांना येत होत्या. वाहतूक व्यवस्था नसलेल्या गावातील तलाठी कार्यालयात जावे लागायचे. तसेच काही गावे मोठी असून देखील तेथे तलाठी सजा नव्हती व काही छोट्या गावांना तलाठी सजा होत्या. अडचणी लक्षात घेऊन चाळीसगाव तालुक्यात 25 वर्षात पहिल्यांदाच नवीन 15 सजांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहे. तसेच शासनाने देखील याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.

44 सजांची रचना
चाळीसगाव तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील आणि तहसिलदार कैलास देवरे यांनी यांनी पाठपूरावा करून 44 तलाठी सजांची रचना समजून घेत त्याबाबत स्थानिक सरपंच, जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून सूचना जाणून घेतल्या होत्या. तसेच गावाची भौगोलिक रचना, रस्ते-दळणवळण आदी बाबी लक्षात घेऊन नवीन किती सजा निर्माण करता येतील याबाबत अभ्यास केला.

ताण कमी होणार
वाढती लोकसंख्या वाढते नागरिकरण या अनुषंगाने क्षेत्रीय महसुल यंत्रणेच्या कामात वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील महसूली कामे गतीने होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तालुक्यातील लोकसंख्या वाढली. मात्र, तलाठी सजेंची संख्या तेवढीच राहिली. तलाठ्यांवरील कामाचा ताण वाढल्याने सजेंची संख्यावाढ करण्याची गरज होती. तालुक्यात अगोदर 44 तलाठी साझे होते. नवीन अधिसुचनेप्रमाणे तालुक्यात 59 सजे होतील. तालुक्यात एकुन 15 तलाठी सजे वाढणार आहेत. यामुळे तलाठ्यांचा कामाचा ताण कमी होणार आहे.

31 रोजी होणार मसूदा
नवीन रचनेनुसार चाळीसगाव शहराचे तीन भाग करण्यात आले आहेत. 31 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर याचा मसुदा जाहीर करणार असून नागरिकांना हरकत घेण्याची मुदत आहे. चाळीसगाव 2, चाळीसगाव 3, न्हावे, करजगाव, नांद्रे, कुंझर, दहीवद, चिंचखेडे, करगाव, जामडी प्र.ब., लोंजे, बाणगाव, हिरापूर, विष्णुनगर, टाकळी प्र.दे. आदी नवनिर्मित तलाठी सजे आहेत.