25 विचारवंत, लेखकांना सुरक्षा

0

बेंगळुरू । पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर राज्यातील 25 साहित्यिक आणि पुरोगामी विचारवंतांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी शिफारस कर्नाटकच्या गुप्तवार्ता विभागाने पोलिसांना केली होती. या शिफारशीनुसार राज्य पोलिसांनी ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक गिरीश कार्नाड यांच्यासह बंगारू रामचंद्राप्पा, के. एस. भगवान, योगेश मास्टर, जयप्रकाश, चेन्नवीरा पाटील, पाटील पुट्टप्पा, लिगायत आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे माजी आयएएस अधिकारी एस. एम. जामदार यांना संरक्षण देण्यात आले आहे.

धमक्या मिळालेल्या लेखकांचा समावेश
गौरी लंकेश यांच्या हत्येच्या घटनेनंतर धार्मिक आणि क्षेत्रीय विषयांवर विश्लेषण करणार्‍या लेखक आणि विचारवंतांना सुरक्षा पुरवण्यात यावी, असे सिद्धरामय्या म्हणाले होते. त्यानुसार कर्नाटकातील 25 व्यक्तींना सुरक्षा देण्यात आली आहे. यामध्ये लेखक आणि विचारवंतांचा समावेश आहे. पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावांची यादी तयार केली होती. एखाद्या विषयावरील परखड भाष्यामुळे वाद निर्माण झाला आहे आणि ज्यांना धमक्या मिळाल्या आहेत, अशा लेखक आणि विचारवंतांच्या नावांचा या यादीत समावेश आहे.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी हत्या : तपास संथगतीने
बंगळुरूत पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येने लेखक, विचारवंतांच्या जीवितास धोका असण्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. अजून महाराष्ट्र सरकारला जाग आली नसली तरी कर्नाटक सरकारने विचारवंतांना सुरक्षा दिली आहे. चार वर्षांत चार जणांच्या हत्या झाल्या. डॉ. दाभोलकरांची 20 ऑगस्ट 2013 ला पुण्यात तर फेब्रुवारी 2015 मध्ये गोविंद पानसरेंची हत्या झाली. सप्टेंबर 2015 मध्ये कर्नाटकच्या धारवाडमध्ये डॉ. एस. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली. त्यांच्या हत्यांच्या तपासाला अजूनही यश आलेले नाही.