25 सदनिकांसाठी 3000 अर्ज!

0

पिंपरी-चिंचवड : गेल्या 20 ते 25 वर्षांपासून खाली पडलेल्या सदनिकांच्या विक्रीसाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए)ने जाहिरात काढल्यानंतर या विक्रीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. एकूण 25 सदनिकांसाठी आजपर्यंत तीन हजार अर्ज आले आहेत, अशी माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके यांनी दिली. विक्रीअभावी धूळ खात पडलेल्या या सदनिकांची पुन्हा विक्री प्रक्रिया राबविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मान्यता दिली होती. त्यासाठी शहर भाजपच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घालण्यात आला होता.

अर्जविक्रीतून 9 लाख कमावले
प्राधिकरणाच्या विविध भागात या सदनिका आहेत. प्राधिकरणाच्यावतीने विविध गृहनिर्माण योजना गेल्या 20 ते 25 वर्षात राबविण्यात आल्या होत्या. त्यातील काही सदनिका विक्री झाल्यात तर या 25 सदनिकांची विक्री झाली नव्हती. वाकड, सेक्टर 28, सेक्टर 20 आणि यमुनानगर या भागातील या सदनिका आहेत. सदनिका जुन्या असल्या तरी सद्याच्या बाजारभावाप्रमाणेच त्यांना दर लावण्यात आल्याने मात्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहेत. या सदनिकांच्या विक्रीसाठी प्राधिकरणाला भरभरून प्रतिसाद मिळाला. अर्जविक्रीसाठी 25 एप्रिल ही अखेरची तारीख असून, आतापर्यंत तीन हजार अर्जांची विक्री झाली आहे. तर अर्जाची किंमत 300 रुपये ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे, अर्जविक्रीतूनच प्राधिकरणाला नऊ लाख रुपयांची प्राप्ती झाली आहे. अर्जासोबत वन बीएचके सदनिकेसाठी दहा हजार रुपये तर टू बीएचके सदनिकेसाठी 15 हजार रुपयांचा डीडी जमा करावा लागत आहे. सद्याचे या भागातील बाजारभाव पाहाता या सदनिका तशा स्वस्तच आहेत, असेही प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

आ. जगतापांनी केली होती मागणी
विक्रीअभावी धूळ खात असलेल्या या सदनिकांची विक्री प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी यासाठी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी तातडीने विक्रीची परवानगी दिली होती. या सदनिकांची विक्री करताना प्राधिकरणाने आरक्षण धोऱणाचादेखील अवलंब केलेला असल्याने गरजूंना या सदनिकांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.