गांधीनगर : सौराष्ट्रनंतर आता उत्तर गुजरातमध्ये पावसाने कहर केला आहे. बनारस काठामधील धानेरा शहर पूर्णपणे पाण्याखाली बुडाले आहे. सोमवारी रात्री पावसातच 25 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेे आहे. उत्तर गुजरातला पावसाचा विशेष फटका बसला असून तेथील एक हजार लोकांना वाचवून 15 हजार जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. प्रशासनाने अतिवृष्टीमुळे 100 गावे रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. पावसामुळे मृत झालेल्यांची संख्या 70 वर पोहोचली आहे.
सरकारचे अनेक कार्यक्रम रद्द
धानेरामध्ये मागील 24 तासात 250 मि.मि पाऊस पडला. पालनपूर, दांतिवाडामध्येही इतकेच पावसाचे प्रमाण आहे. लोक छतांवर चढून आपल्या जीवाचे रक्षण करीत आहेत. धानेरा येथे एनडीआरएफच्या सहा टीम दाखल झाल्या आहेत. वायुदलाची तीन हेलिकॉप्टर आणि आर्मीची एक टीम दानोरात दाखल झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 24 तास उत्तर आणि मध्य गुजरातमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. गुजरात सरकारने 27 जुलै रोजी सुरू होणारी नर्मदा यात्रा आणि हरिटेज वॉक हे कार्यक्रम रद्द केले आहेत.
अफवांमुळे भीती
पुराबरोबरच सोमवारी मच्छु नदीवर बांधलेल्या धरणाचा बांध फुटल्याच्या अफवांनी भीती पसरवली. लोक घरे सोडून उंच ठिकाणी पळून गेले. 1979 मध्ये मच्छू नदीचा बांध फुटल्यामुळे हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते. त्याची आठवण यावेळी यानिमित्ताने येथील लोकांना झाली.
पंतप्रधानांनी केली हवाई पाहणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. राज्यातील पुराची माहिती मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंगळवारी सकाळी मोदी यांना फोनवरुन दिली होती. मोदींनी अहमदाबाद विमानतळावरच मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकार्यांसोबत बैठक घेवून मदतकार्याचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी मदतकार्यासंबंधी महत्वाच्या सूचना दिल्या.