वाकड : सर्वस्तरातील गोरगरीब, निराधार लोकांना मदतीचा हात मिळावा, यासाठी शासनाकडून विविध अभिनव योजना जाहीर केल्या जातात. परंतु शासकीय अधिकारी व कर्मचार्यांची अनास्था, शासनाच्या योजनांविषयी असलेली लोकांची अनभिज्ञता अशा अनेक कारणांमुळे चांगल्या योजना थेट तळागाळापर्यंत पोहचत नाहीत. नेमकी हीच परिस्थिती ओळखून काळाखडक, वाकड येथील सामाजिक कार्यकर्ते व युवानेते अनिल जाधव यांनी प्रामाणिक प्रयत्न करून येथील सुमारे 250 निराधार लोकांना हक्काच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. उपजिविकेचा कोणताही आधार नसलेल्या लोकांना पेन्शन योजनेचा लाभ मिळाल्याने त्यांच्या चेहर्यावर एक प्रकारचे समाधान दिसून आले. अनिल जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या मित्रपरिवारातर्फे आयोजित सोहळ्यात या लाभार्थी नागरिकांना संजय गांधी निराधार पेन्शन योजनेच्या लाभाचे पत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या सोहळ्याला शिवसेनेचे शहरप्रमुख व महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका उपाध्यक्ष नंदकुमार भोईर, युवानेते अनिल जाधव या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. वाकड, काळाखडक परिसरातील सुमारे 250 निराधार लोकांना पेन्शन योजनेच्या लाभाचे पत्र यावेळी देण्यात आले. त्यात अपंग, वृद्ध, ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. यापुढेही निराधार लोकांच्या सेवेसाठी आपण तत्पर राहू, अशी ग्वाही याप्रसंगी अनिल जाधव यांनी दिली. याप्रसंगी त्यांच्या मित्रपरिवाराची मोठी उपस्थिती होती.
सामाजिक कार्यातही अग्रेसर
युवानेते असलेले अनिल जाधव हे सामाजिक कार्यातही सदैव अग्रेसर राहतात. वेळोवेळी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे, अनाथ आश्रमांमध्ये फळवाटप करणे, गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करणे, असे उपक्रम त्यांच्याकडून सातत्याने आयोजित केले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. तसेच, दोन अनाथ आश्रमांमध्ये फळवाटपदेखील करण्यात आले.