2500 कोटींचा कर थकविला, कॉग्निझंटची खाती गोठविली!

0

प्राप्तिकर विभागाची कारवाई

पुणे : लाभांश विवरण कर (डीडीटी) न भरल्याने प्राप्तिकर विभागाने कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्यूशन या कंपनीची अनेक बँक खाती गोठविण्याची कारवाई केली आहे. कॉग्निझंटमध्ये सुमारे दोन लाख कर्मचारी काम करत असून, पुणेसह भारतातील ती एक मोठी आयटी कंपनी आहे. प्राप्तिकर विभागाने मे 2016मध्ये सुरू केलेल्या तडजोडीच्या योजनेत स्वत:चे शेअर्स खरेदी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीचे शेअर्स एका मॉरीशस कंपनीने (54 टक्के) आणि अमेरिकी कंपनीने (46 टक्के) खरेदी केले आहेत.

2500 कोटी रूपये कर भरण्यात अपयश
अशाप्रकारचा व्यवहार केवळ कंपनी कायदा, कलम 77 अ अंतर्गत येणार्‍या कंपन्यांनाच करता येतो. परंतु, कॉग्निझंट कंपनीला हे कलम लागू होत नाही. प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार प्राप्तिकर विभागाने कॉग्निझंट कंपनीची मुंबई आणि चेन्नई येथील बँक खाती लाभांश विवरण कर न भरल्याप्रकरणी गोठविली आहेत. कॉग्निझंट कंपनीला 2019-17 च्या डीडीटीपोटी 2500 कोटी रूपये भरायचे होते. परंतु, कंपनीला ते भरण्यात अपयश आले आहे.

कायदेशीर मार्ग अवलंबणार
प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना कॉग्निझंट कंपनीच्या प्रतिनिधीने म्हटले, की प्राप्तिकर विभागाने केलेली कारवाई ही अयोग्य आणि कायद्याला अनुसरून नाही. यासंबंधीचे सर्व कर कॉग्निझंट कंपनीने भरलेले आहेत. कंपनी याप्रकरणी कायदेशीर मार्ग अवलंबणार आहे.