पुणे । आवाज आणि स्मरणशक्तीच्या जोरावर आपल्या आयुष्याच्या वाटा शोधणा-या दृष्टीहिन मुलां-मुलींच्या आयुष्यात प्रकाशवाटा देणारा दीपोत्सव उत्साहात साजरा झाला. देवदिवाळीनिमित्त समाजाच्या वंचित-विशेष घटकांचे आयुष्य प्रकाशमान करण्याचा संकल्प करीत बुधवार पेठेतील दत्तमंदिरामध्ये 2 हजार 500 दिवे या दृष्टीहिन मुलांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आले.
कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात देवदिवाळीनिमित्त तेलाच्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अॅड.शिवराज कदम जहागिरदार, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, विश्वस्त युवराज गाडवे यांसह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. सुभाष सरपाले यांनी सजावट केली. मंदिराचे प्रवेशद्वार, कळस व गाभारा फुलांच्या माळांनी तसेच रांगोळीने सजविण्यात आले. याशिवाय आकर्षक पुष्परचना साकारुन पारंपरिक पद्धतीने दीपोत्सव करण्यात आला. लुई ब्रेल अंध-अपंग संस्थेतील रुपाली शिंदे, मैना राजुरे, शुभांगी साळुंके, रविंद्र कानडे, विठ्ठल राऊत, किरण आंत्रे यांसह अनेक मुला-मुलींनी दीपोत्सवात उत्साहाने सहभाग घेतला.