26 आठवड्यांनंतरही होईल गर्भपात

0

नवी दिल्ली। गर्भधारणा होऊन सव्वीस आठवडे उलटले असले तरी गर्भाला हृदयासंबंधीत गंभीर आजार असल्यास गर्भपात करता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालात स्पष्ट केले आहे. कलकत्ता येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या महिलेला 26 आठवड्यांनतर गर्भपात करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि एम. खानविलकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणीला आलेल्या प्रकरणात गर्भपातासंबंधात निर्णय देण्यात आला आहे.

बाळाच्या आई-वडिलांनी गर्भपाताला परवानगी देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यांनी 1971 च्या वैद्यकीय गर्भपात कायद्यातील 20 आठवड्यानंतर गर्भपात करता येऊ शकत नाही या तरतुदीला आव्हान दिले होते. यावर कोर्टाने पश्‍चिम बंगाल सरकारने नेमलेल्या सात सदस्यीय वैद्यकीय मंडळाचा अभिप्राय लक्षात घेतला. मंडळाने 24 आठवड्यांच्या गर्भाचा अभ्यास करून अहवाल दिला. कलकत्ता येथील एसएसकेएम हॉस्पिटलचा अहवालही न्यायालयाने विचारात घेतला.