सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका प्रशासन दक्ष
पिंपरी-चिंचवड : दमदार पाऊस झाल्याने शहरातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेने शहरातील 26 घाटांवरच गणेश विसर्जनाची सोय केली आहे. या घाटांवरच गणेश मंडळांनी गणपती मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेच्या वतीने अग्निशामक विभाग, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा विभाग, क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अग्निशामक विभागाच्या नियंत्रणाखाली गणेश विसर्जनासाठी सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. महापालिकेने गणेश विसर्जनासाठी नेमून दिलेल्या 26 गणेश विसर्जन घाटांवरच गणेश मूर्तींचे विसर्जन नागरिकांनी व गणेश मंडळांनी करावे, असे अपेक्षित आहे.
या ठिकाणी आहे व्यवस्था
निगडी, प्राधिकरण तळे, गणेश तलाव, वाल्हेकरवाडी घाट, रावेत घाट, जलशुद्धीकरण केंद्र, किवळे घाट, स्मशान घाट, रावेत भोंडवे वस्ती (मळेकर) घाट, थेरगाव पूल नदी घाट (पवना), मोरया गोसावी, चिंचवड नदी घाट, केशवनगर, चिंचवड घाट, ताथवडेगाव, स्मशान घाट, पुनावळे गाव, स्मशान/राम मंदिर घाट, वाकड गावठाण घाट, कस्पटे वस्ती घाट, सांगवी स्मशान घाट, सांगवी दशक्रिया विधी घाट, सांगवी वेतनाळ बाबा मंदिर घाट, कासारवाडी स्मशान घाट, फुगेवाडी स्मशान घाट, बोपखेल घाट, पिंपरीगाव स्मशान घाट, काळेवाडी स्मशान घाट, पिंपळेगुरव घाट, काटे पिंपळे घाट, सुभाषनगर घाट पिंपरी, पिंपळे निलख घाट, मोशी नदी घाट, चिखली स्मशान घाट या 26 घाटांवर विसर्जनाची व्यवस्था आहे.
महापालिकेचे आवाहन
गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी घाटावर तयार करण्यात आलेले बॅरिकेट्स व सुरक्षा दोरी ओलांडू नये, गणेश विसर्जन करताना मद्यपान करून येऊ नये, लहान मुले, वृद्ध, स्त्रिया, अपंग व्यक्तींनी विसर्जनाच्या ठिकाणापासून दूर राहावे, विसर्जनाच्या ठिकाणी खाजगी बोटीमध्ये किंवा नाव अथवा तराफ्यामध्ये लहान मुले, वृद्ध, स्त्रिया, अपंग यांनी बसून गणेश विसर्जन करू नये, गणेश विसर्जनासाठी महापालिकेने तयार केलेल्या पाण्याचा हौदाचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
सूचनांचे पालन करा
गणेश मूर्ती विसर्जनासाठी घाटावरील उपलब्ध कुशल व्यक्ती अथवा नावाडी असल्यास फक्त पोहता येत असलेल्या तरूण पुरुष कार्यकर्ते यांचा उपयोग करावा. गणेश विसर्जन करत असताना महापालिकेमार्फत सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेल्या कर्मचार्यांकडून दिल्या जाणार्या सूचनांचे पालन करावे, असेदेखील आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.