26 पाकिस्तानींनी दिली पोलिसांच्या हातावर तूरी

0

मुंबई । जुहू परिसरात गेल्या 10 वर्षांपासून वास्तव्यास असलेले 26 पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे. विविध तपास यंत्रणांकडून या 26 पाकिस्तानी नागरिकांचा रात्रंदिवस शोध सुरू आहे. गुप्तचर विभागाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू परिसरात वास्तव्यास असलेले हे पाकिस्तानी नागरिक गेल्या दोन दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले. यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाची धावाधाव सुरू आहे.

सी फॉर्म अर्धवट भरून पसार झाले
सी फॉर्ममध्ये पाकिस्तानमधून भारतात येणार्‍यांना मुक्कामाचे ठिकाण, ते किती दिवस थांबणार आहेत, पासपोर्ट आणि व्हिसाची प्रत आणि निवासी परवान्याबाबत सर्व माहिती द्यावी लागते. या सर्व 26 पाकिस्तानींनी सी फॉर्म अर्धवट भरल्याचे आढळून आल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. एटीएस मुंबईतील सर्व हॉटेल आणि लॉजमधून या लोकांचा शोध घेत आहे.