पुणे । मुंबईमध्ये 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना पुणेकरांनी रविवारी मानवंदना दिली. या घटनेला 9 वर्ष पूर्ण झाली. शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. पुणे शहर पोलिस दक्षिण विभाग आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे मेणबत्त्या लावून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
चित्रांतून शहिदांना सलाम
शहीदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस दक्षिण विभाग आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. शहिदांना सलाम करणारी पेंटींग… पोलीस बँड आणि अधिकार्यांनी दिलेली सलामी आणि चिमुकल्या हातांनी कॅनव्हासवर भारत माता की जय रेखाटत देशभक्तीचा दिलेला संदेश अशा देशप्रेमाने भारलेल्या वातावरणात चिमुकल्यांनी चित्रांच्या माध्यमातून मुंबई 26/11 हल्ल्यातील शहिदांना मानवंदना दिली. यावेळी अप्पर पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर, परिमंडळ 1 चे उपायुक्त बसवराज तेली, मंडळाचे अध्यक्ष वैभव वाघ, सचिन चव्हाण, सचिन ससाणे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ परिमंडळ 2 चे उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे यांच्या हस्ते झाला.
मेणबत्त्या पेटवून आदरांजली
शहर काँग्रेसने संविधान दिनाच्या पूर्वसंध्येस भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान उद्देशिकाचे वाचन केले. तसेच 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना मेणबत्त्या लावून श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी शहिद हवालदार स्व. अंबादास पवार यांचे बंधू सुनिल पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. संविधानाचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी भारतातील प्रत्येक नागरिकाची आहे. संविधान टिकेल तर देश टिकेल. आज संविधान धोक्यात आल्यामुळे लोक रस्त्यावर उतरली आहेत. भाजप सरकार संविधानाला न जुमानता आपला मनमानी कारभार करीत आहे त्यामुळे आजच्या तारखेला संविधान बचाव ही भूमिका आपल्या सारख्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे, असे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.
राष्ट्रासाठी एकत्र या
26/11 च्या हल्ल्यात पोलिसांनी प्राणांची आहुती दिली. त्यांचे हे बलिदान अतिशय मौल्यवान आहे. जास्तीत जास्त लोकांमध्ये त्यांचे कार्य पोहचायला हवे. राष्ट्रासाठी एकत्र येऊन आपली एकजूट आपण दाखवायला हवी. भारत हा माझा देश आहे, हे ठणकावून सांगायला हवे.
– रविंद्र सेनगावकर
अप्पर पोलिस आयुक्त
अधिकार्यांनी दिले बलिदान
अतिरेक्यांनी मुंबईत येवून निरअपराध लोकांवर हल्ला केला. भारताच्या आर्थिक राजधानीला धक्का देण्याचा प्रयत्न केला. हुतात्मा अशोक कामठे, करकरे, विजय साळसकर, पोलिस कर्मचारी व एन. एस. जी. कमांडो यांनी अतिरेक्यांशी लढा दिला. यांनी दिलेले बलिदान देशातील जनता कधीही विसरू शकणार नाही.
– रमेश बागवे
अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी