263 जणांचा मृत्यू; 7581 संशयित रुग्ण

0

मुंबई । पावसाळ्यात विविध आजारांनी अनेक जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागते. हे वर्षही यास अपवाद नसून तापासह अन्य व स्वाईन फ्लूसारख्या अजारानेही चांगलेच डोके वर काढले आहे. या आजाराने आतापर्यंत राज्यात 263 रुग्ण दगावले आहेत. त्यात पुण्यातील सर्वाधिक म्हणजे 62 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईसह राज्यातील विविध शहरे व ग्रामीण भागातही या आजाराचे रुग्ण असून ते उपचार घेत आहेत. स्वाइन फ्लू आजाराची व्याप्ती पाहता ही स्थिती नियंत्रणात आणण्याचे आव्हान राज्याच्या आरोग्य विभागापुढे निर्माण झाले आहे. साधारणत: स्वाइन फ्लू वायरसचा प्रसार पावसाळ्याअखेरीस होत असतो. मात्र यावर्षी या आजाराचा प्रभाव ऐन पावसाळ्यातच वाढला असून त्यापूर्वीपासूनही या आजाराचे रुग्ण आढळून आल्याचे दिसून आले आहेत. यामुळे आरोग्य खात्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

साधारणत: ऑक्टोबर महिन्यात स्वाईन फ्लूचा आजार अधिक जोर धरत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे मात्र पावसाळा सुरू होतानाच अधिक आक्रमक झाला असून जानेवारी 2017 पासून 29 जून 2017 पर्यंत राज्यात 263 रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते. एकट्या मुंबईत 12 झाल्याचे सांगण्यात येते. पुण्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल 62 जणांचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाला आहे.

1720 रुग्ण घेताहेत उपचार
स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये होणारी वाढती वाढ गंभीर असून प्राप्त माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 7581 संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली त्यापैकी या आजाराचे 1720 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे या आजाराने निर्माण केलेले आव्हान मोठे असून राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने याबाबत तातडने योग्यती पावले टाकणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आजारावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यासंदर्भात कार्यवाहीची गरज निर्माण
झाली आहे.

टॅमी फ्लूचा पुरेसा साठा
यावर्षीही स्वाईन फ्लू आजाराने अनेकांची झोप उडवलीय. रुग्णांनीही योग्यती खबरदारी घेत उपचार घेण्यावर भर द्यायला हवा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सरकारने खाजगी रुग्णालये आणि दवाखान्यांतील संशयित रुग्णांवर थेट उपचार करण्याचे आदेश दिले असून या आजारावरील औषध म्हणून वापरल्या जाणार्‍या टॅमी फ्लूचा पुरेसा साठा असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.