रामपूर । उत्तर प्रदेशातील रामपूर येथे शुक्रवारी पहाटे ट्रकखाली कार घुसून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा जागेवरच मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 मुलांचा समावेश आहे. या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. रामपूरमधील दिल्ली-लखनऊ हायवेवर मंसूरपूर बायपासवर हा भीषण अपघात झाला आहे.
मिळालेली माहिती अशी की, अलीनगर जनूबीमध्ये बायपासवर एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. महामार्गावर लोकांची गर्दी पाहून ट्रक चालकाने अर्जंट ब्रेक लावला. मागून येणारी कार ट्रकवर मागून आदळली. अपघातग्रस्त कुटुंब एक विवाह समारंभ आटोपून परत येत होते. जखमींना जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच डीएम आणि एसपी हॉस्पिटलमध्ये पोहोचून जखमींची विचारपूस केली. गंभीर जखमींना मुरादाबाद आणि मेरठ येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. राज्यमंत्री बल्देव सिंह ओलख यांनीही हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. मित्रपाल, कमलेश, नेहा, नितीश, सूरजपाल, नवीन अशी मृतांची नावे आहेत. छत्रपाल, फूलवती, नीलम, अंकित, अनिकेत गंभीर जखमी झाले आहेत.