स्वयंघोषित गोरक्षकांची चप्पल, बेल्टने मारहाण

0

मध्य प्रदेश । गो हत्येच्या संशयावरून माणसांना मारहण, हत्येच्या घटना देशभरात वाढत चालला आहे. स्वयंघोषित गोरक्षक देशभरात फोफावले आहेत. मध्य प्रदेशमधील उजैन जिल्ह्यात स्वयंघोषित गोरक्षकांची गुंडगिरी समोर आली आहे. उजैन जिल्ह्यात पाच ते सहा जण एका तरुणाला चप्पल आणि बेल्टने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

उजैन जिल्ह्यातील जीवाजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला पाच ते सहा जणांचे टोळके पट्ट्याने मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओतील संभाषणावरून हे सर्व जण स्वयंघोषित गोरक्षक असल्याचे दिसते. तू गोहत्या करणार, गाय आमची माता आहे असे ते हल्लेखोर वारंवार म्हणत होते. तू गायीची हत्या करणार असा जाब विचारत हे टोळके त्या तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे उजैनमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हे गोरक्षक नव्हे
जीवाजीगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ओ. पी. मिश्र यांनी मात्र हल्लेखोर हे गोरक्षक नसल्याचे वक्तव्य केले आहे. उधारीने घेतलेले पैसे परत न दिल्याने ही मारहाण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. पीडित तरुणाचे नाव अपुदा मालवीय असून चेतन संखला, विकास उर्फ भुरा, नीलेश संखला, शूभम अशी या आरोपींची नावे आहेत.

अधिक तपास सुरू
पोलिसांनी चेतन आणि विकासला अटक केली असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोरक्षकांनी आणखी एकाला मारहाण केल्याची घटना गांधी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. सहा जणांनी मिळून गोवंश हत्या केल्याच्या संशयातून एकाला बेदम मारहाण खेली. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.