27 रोजी जिल्हा परिषद बांधकाम समितीबाबत होणार फैसला

0

जळगाव । जिल्हा परिषदेतील बांधकाम समिती सभापती निवड नियमबाह्य झाली आहे. निवड नियमबाह्य असल्याचा ठपका निवड समिती सचिव उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांनी ठेवला आहे. महिला व बालकल्याण समिती सभापती असलेल्या भाजपाच्या रजनी चव्हाण यांच्याकडे बांधकाम समिती सभापतीपद देण्यात आले आहे. अगोदर खातेवाटप झालेल्या सदस्यांकडे नियमान्वये बांधकाम समिती सभापतीपद देता येत नाही. नियमाचे उल्लंघन करुन अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी निवड केली आहे. खुद्द भाजपाच्या सदस्यांनीच ही समिती विखंडीत करावी अशी मागणी केली आहे. नाकिश विभागीय आयुक्त यांच्याकडे समिती विखंडनाबाबत अर्ज करण्यात आला आहे. तक्रारदार पल्लवी सावकारे ह्या देखील भाजपाच्याच असून त्या भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य आहे. याबाबत आज 27 रोजी आयुक्तालयात समितीबाबत सुनावणी होणार आहे. मागील आठवड्यात 19 रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. प्रशासनातर्फे खुद्द सीईओंनी बाजु मांडली होती तर दोन्ही पक्षांतर्फे वकीलांनी बाजू मांडली. अध्यक्षांच्या वकीलांनी संबंधीत विषयाबाबत अभ्यास करण्यासाठी 1 महिन्याची मुदत मागितली असता त्यांना आठवड्याभराची मुदत देण्यात आली होती.