27 गावांना केडीएमसी देणार तात्पुरते पाणी

0

कल्याण । कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनल्याने मागील आठवड्यात महापालिका मुख्यालयावर ग्रामस्थांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर, सोमवारी या गावांमधील नगरसेवकांनी आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेऊन चर्चा केली. भीषण पाणीटंचाई पाहता तात्पुरत्या स्वरूपात का होईना, महापालिकेने त्यांच्या पाणीपुरवठा योजनेतून पाणी द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. बेकायदा बांधकामांवरही कारवाई करावी आणि तेथील नळजोडण्या खंडित कराव्यात, याकडेही या वेळी लक्ष वेधण्यात आले.

27 गावांना एमआयडीसीकडून 35 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. परंतु, उन्हाळ्यातील पाणीकपातीमुळे 17 ते 18 दशलक्ष लीटर पाणी ग्रामीण भागाला मिळत होते. त्यानंतर, पावसाळ्यात चांगला पाऊस पडूनही सध्या पिण्याच्या पाण्याची कमतरता 27 गावांमध्ये भेडसावत आहे. काही महिन्यांपूर्वी ग्रामीण भागातील भाजपच्या नगरसेवकांनी जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन अतिरिक्त 30 दशलक्ष लीटर पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. यावर संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेअंती प्रती दिन वाढीव 17 दशलक्ष लीटर पाणी देऊ, या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले होते. परंतु, अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत तसेच बेकायदा बांधकामधारक पाणी पळवत असल्याच्या निषेधार्थ मागील आठवड्यात 27 गावांतील ग्रामस्थांनी महापालिका मुख्यालयावर भव्य हंडाकळशी मोर्चा काढला.

एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत असलातरी राजरोसपणे उभ्या राहणार्‍या बेकायदा बांधकामांवर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. परिणामी, ग्रामस्थांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही, असा आरोप ग्रामस्थ व नगरसेवक करत आहेत. मोर्चाच्या वेळी आयुक्त ई. रवींद्रन शिष्टमंडळाला भेटू शकले नव्हते. त्यामुळे त्यांनी सोमवारी 27 गावांतील नगरसेवकांना पाणीप्रश्नावर चर्चेला बोलावले होते. या वेळी महापालिकेने आम्हाला तात्पुरता दिलासा द्यावा, अशी विनंती नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी केली. सरकारकडून पाण्याचा अतिरिक्त कोटा मंजूर झाला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी एप्रिलअखेर होण्याची शक्यता आहे. सध्याची भीषण पाणीटंचाई बघता पाणीपुरवठा विस्कळीत न करता महापालिकेच्या नवीन जलकुंभातून जरी नळजोडण्या दिल्या तरी तात्पुरत्या स्वरूपात का होईना गावांना पाणी उपलब्ध होईल, अशी मागणी या वेळी रवींद्रन यांच्याकडे करण्यात आली.

बेकायदा बांधकामे करणारे पाणीचोरी करतात. त्यामुळे अशा बांधकामांवर तातडीने कठोर कारवाई करावी, जेणेकरून ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळेल, असेही नगरसेवक म्हणाले. यावर, पुरेसा बंदोबस्त देण्याचे पोलिसांनी मान्य केले आहे. त्यानुसार, बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई होईल, असे आयुक्त म्हणाले.