27 गावातील कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण

0

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सामील करण्यात आलेल्या 27 गावातील कचर्‍याची समस्या गंभीर बनली आहे. या गावामध्ये रस्त्याच्या कडेला कचरा साचला असून साचलेल्या कचर्‍याच्या ढिगार्यावर पावसाचे पाणी पडल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाकडून हा कचरा उचलला जात नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पालिका प्रशासनाने संबंधित विभागाने नियमित कचरा उचलण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात शहरातील कचरा नियमित उचलला जात नसल्याचे चित्र आहे. शहरतील कचरा कुड्या देखील कचर्याने ओसंडून वाहत आहेत. मात्र ग्रामीण भागातील परिस्थिती अतिशय दयनीय असून रस्त्याच्या कडेला कचर्‍याचे ढीग साचले आहेत. मात्र पालिकेच्या घनकचरा विभागाकडून हा कचरा उचलला जात नसल्यामुळे नागरिकाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सागाव सागर्ली परिसर तर शहराला खेटून असून या भागातला कचरा देखील नियमित उचलला जात नाही.

स्थानिकांमध्ये संताप
डोंबिवलीकडून कल्याण-शिळकडे जाणार्या मानपाडा रस्त्यावरून मोठ्या प्रमाणत वाहतूक सुरु असते. या रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला कचर्याचा ढीग अर्ध्या रस्त्यावर आला असून या कचर्यावर पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे सडलेल्या कचर्याची दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. कचर्यामुळे डासाचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार फैलावण्याची भीती वाढली आहे. मात्र वारंवार तक्रार करूनही हा कचरा उचलण्यास घनकचरा विभागाला अद्याप मुहूर्त मिळालेला नसल्यामुळे नागरिकाच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या रस्त्यावरून जाताना वाहन चालकाना देखील नाकाला रुमाल लावावा लागत आहे. तर या परिसरात राहणार्‍या नागरिकांनी राहायचे तरी कसे? असा प्रश्न स्थानिक नागरीकाकडून विचारला जात आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
पालिका प्रशासनाकडून सर्व प्रकारचे कर नियमित वसूल केले जात असताना मुलभूत सुविधा मिळविण्यासाठी नागरिकांनी संघर्ष का करावा असा संतप्त सवाल नागरिकाकडून आता विचारला जात आहे. याबाबत पालिकेच्या सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या ठिकाणी कचर्‍याचे ट्रान्स्पोर्ट स्टेशन असून 7 गावातील कचरा या ठिकाणी गोळा करून दुपार नंतर तो उचलला जातो. यामुळे या ठिकाणी कचर्याचा ढीग दिसतो. मात्र घनकचरा विभागाकडून याठिकाणी नियमित फवारणी केली जात असल्याचे सांगितले.