पोचेफ्स्ट्रूम । भारतीय महिला क्रिकेट टीमने सोमवारी एक नवा इतिहास रचला आहे. आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात दीप्ति शर्मा आणि पूनम राउत यांनी तब्बल 320 धावांची भागीदारी रचली. या दोघींच्या दमदार ओपनिंगच्या जोरावर भारतीय संघाने 50 षटकांच्या अखेरीस आयर्लंडसमोर 3 बाद 358 धावांचा डोंगर रचला. आंतरराष्ट्रीय महीला एकदिवसीय क्रिकेटमधील ही कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. आफ्रिकेच्या धर्तीवर सध्या भारत, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेत चौरंगी मालिका खेळवली जात आहे.
दिप्ती शर्माची 188 धावांची खेळी
सामन्यात दिप्ती शर्माने तब्बल 188 धावांची खेळी साकारली. दिप्तीची 188 धावांची खेळी महिला क्रिकेट विश्वातील सर्वाधिक धावांची दुसरी वैयक्तिक खेळी ठरली आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क हिची 229 धावांच्या खेळीसह पहिल्या क्रमांकावर आहे. सोमवारी दिप्ती आणि पुनमने ऐतिहासिक भागीदारी रचली. पुनमने 116 चेंडूत 109 धावांची खेळी साकारली. यात 11 चौकारांचा समावेश होता. 109 धावांची खेळी करून पूनम रिटायर्ड झाली. तर दिप्ती शर्माने 160 चेंडूत 188 धावांची ठोकल्या. यात तब्बल 27 चौकारांचा समावेश आहे. सामन्याच्या 46 व्या षटकात ही जोडी फुटली. भारतीय संघाने या मालिकेत सध्या तीन सामने खेळले असून तीनही सामने जिंकले आहेत. 359 धावांचा सामना करायला उतरलेल्या आयर्लंडचा अख्खा संघ 40 षटकात केवळ 109 धावांमध्ये गारद झाला.