वासिंद । असह्य धूरात स्वयंपाक करणार्या मोहंडूळ येथील 274 भगिनींची चुलीच्या धूरापासून सुटका झाली आहे. भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून महिलांना मोफत गॅस मिळाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान उज्जवला योजनेतून विशेषतः दुर्गम भागातील गरीब कुटुंबांमध्ये गॅसवाटप करण्यावर खासदार कपिल पाटील यांनी भर देत हा उपक्रम राबविला. मोहंडूळ परिसरातील नागरिकांनी महिलांची व्यथा मांडली होती. चुलीतील धुरामुळे काही महिलांना अस्थमा व डोळ्यांच्या विकाराचा सामना करावा लागत होता. खासदार कपिल पाटील यांनी ही व्यथा ध्यानात घेऊन, सरकारी यंत्रणांना मोहंडूळ गावात गॅसपुरवठा करण्याची सुचना केली होती.
त्यानुसार मोहंडूळ येथील 274 कुटुंबांची निवड करण्यात आली होती. खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते कुटुंबातील भगिनींना मोफत गॅस प्रदान करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत गायकर आदी उपस्थित होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक असलेल्या महिलांनी परिसरातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन खासदार पाटील यांनी केले आहे.