किडे सापडल्याने भारताने थांबवली चिनी सफरचंदांची आयात

0

नवी दिल्ली । चीनमधून आयात होणार्‍या दूध, कँडी, चॉकलेट सारख्या पदार्थानंतर बंदी घातल्यानंतर आता भारताने चिनी फळांच्या आयातीवर बंदी घातली आहे. सफरचंद, नासपती, झेंडू फुले आणि बियाणे या शेतमालामध्ये किडे आढळल्यामुळे भारताने या उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली आहे. चिनी शेतमालावर बंदी घातली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

चीनमधून आयात होणार्‍या शेतमालामध्ये सफरचंद आणि नासपतीचे प्रमाण तब्बल 90 टक्के आहे. भारतीय अधिकार्‍यांनी चीनला पाठवलेल्या अनेक पत्रांमध्ये मालाच्या गुणवत्तेबाबत नियमांचे अनुपालन होत नसल्याचा उल्लेख केला होता तसेच फायटोसॅनिटरी म्हणजेच शेतमालाच्या स्वच्छतेचे नियम पाळले जात नसून त्यांचे उल्लंघन होत असल्याचे भारतीय अधिकार्‍यांनी वेळोवेळी चिनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय अधिकार्‍यांनी चीनला पाठवलेल्या पत्रात सफरचंद, नासपती, आणि झेंडू फुले बियाण्यामध्ये सतत किडे आढळून आल्यामुळे चीनची फायटोसॅनिटरी कंट्रोल सिस्टीम अपयशी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चीनने या पत्राला उत्तर देताना उत्पादनांमध्ये आढळलेले किडे क्वारंटाईन किडे पॅकेजिंग आणि वितरणाच्या प्रक्रियेदरम्यान आले असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

फेब्रुवारी 2017 पर्यंतच्या 11 महिन्यात भारताने चीनमधून 13.2 कोटी डॉलर्स मूल्याची सफरचंद आणि नासपती आयात केली होती. याच काळात त्याआधीच्या वर्षी 4.42 कोटी मूल्याची सफरचंदे आणि नासपती आयात केली होती. म्हणजेच एका वर्षात आयातीत 200 टक्के वाढ झाली. पण आयात मालाच्या गुणवत्तेबाबतच्या नियमांचे सातत्याने उल्लंघन होत असल्यामुळे भारत सरकारने चीनमधून होणार्या या मालाबाबतची अधिक माहिती मागवली आहे. त्यानुसार जुलै महिन्यात चीनचे काही अधिकारी भारतात येणार आहेत.