जंक्शनवरील प्लॅटफार्म क्रमांक नऊ व दहाचे काम आज होणार पूर्ण
भुसावळ- जंक्शन स्थानकावरील नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक 9 व 10 च्या निर्मितीचे काम शुक्रवार, 19 रोजी पूर्णत्वास येत आहेत. रेल्वे प्रशासनाने 19 पासून 28 पॅसेंजरसह 12 एक्स्प्रेस गाड्या या दिवसांपासून सुरू करण्याचे सुतोवाच केले असलेतरी प्रत्यक्षात प्रवाशांच्या सोयी-सुविधांची कामे अपूर्ण असल्याने येत्या चार ते पाच दिवसात बंद झालेल्या एक्स्प्रेस गाड्यांसह पॅसेंजर गाड्या सुरू होतील, असे डीआरएम आर.के.यादव यांनी सांगितले.
दोन महिन्यांपासून तांत्रिक कामांमुळे पॅसेंजर रद्द
भुसावळ ते भादली सेक्शन दरम्यान तिसरी रेल्वे लाईन जोडण्याचे काम सुरू असून नॉन इंटरलॉकींगचेही काम केले जात आहे या शिवाय रेल्वेकडून मेंन्टेनन्स तसेच तांत्रिक कामे केली जात आहेत व विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येत असल्याने 15 फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने तब्बल 28 पॅसेंजर गाड्यांसह 12 एक्स्प्रेस गाडया रद्द करण्यात आल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याने सुमारे दोन महिन्यांपासून खान्देशातील रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
जंक्शनवर आता दहा प्लॅटफार्म
जंक्शनवर सुरूवातीला आठ प्लॅटफॉर्म असल्याने 9 व 10 या दोन प्लॅटफार्मची निर्मिती करण्याचा निर्णय गतवर्षी घेण्यात येवून 50 कोटी रुपये खर्चाच्या प्लॅटफॉर्मचे शुक्रवारी काम पूर्ण होत आहे. 19 रोजी हा प्लॅटफार्म वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असलेतरी प्रवाशांना बसण्यासाठी बाके, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, छत, पंखे आदी सुविधा अपूर्ण असल्याने त्या पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे डीआरएम यादव ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना म्हणाले. येत्या चार ते पाच दिवसात पॅसेंजर व अन्य गाड्या सुरू करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.