जळगाव । जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाची बदली प्रक्रिया शिक्षक बदलीची संख्या अधिक असल्याने स्वतंत्र राबविण्यात येत आहे. शिक्षकांची बदली प्रक्रियेला 28 मे पासून सुरुवात होणार आहे. साधारण महिनाभर बदली प्रक्रिया चालणार आहे. विशेष संवर्ग 1,2,3,विशेष बदलीपात्र, पेसा क्षेत्रातील अशा पाच प्रकारात ही बदली होणार आहे. बदलीची माहिती ऑनलाईन प्रणालीद्वारे मागविण्यात येत आहे. आंतर जिल्हा व जिल्हातंर्गत बदलीसाठी 6 मे पासून ऑनलाईन वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. शिक्षकांच्या बदलीसाठी अवघड, सोपे क्षेत्रानिहाय सर्वेक्षण करण्यात आले आहे. अवघड क्षेत्रात तीन वर्ष व इतर ठिकाणी 10 वर्ष सेवा पुर्ण केलेले शिक्षक बदलीस पात्र असणार आहे. शिक्षक बदलीचा नवीन अध्यादेश(जीआर) डोके दुखी ठरत असल्याची प्रतिक्रीया शिक्षकांमधुन येत आहे.
विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख
शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांची देखील या महिन्याभरात बदली होणार आहे. जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांच्या बदलीची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. यादी बाबत काही हरकत नोंदवावयाची असल्यास त्वरीत नोंदवावे असे आदेश देण्यात आले आहे. बदलीचे अधिकार हे शिक्षणाधिकारी यांच्याकडे आहे.
वर्ग 3, 4 च्या बदल्या
जिल्हा परिषदेत कार्यरत असणार्या वर्ग 3 व वर्ग 4 ची बदली प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. 8,9,11 मे दरम्यान जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग वगळता इतर विभागाची बदली करण्यात येणार आहे. सोमवारी 8 रोजी ग्रामपंचायत विभाग, अर्थविभाग, पशुसंवर्धन विभाग, बांधकाम विभाग, मंगळवारी 9 रोजी महिला बालकल्याण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा , सिचन, गुरुवारी 11 रोजी सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभागाच्या बदल्या होणार आहे. शिक्षकांच्या तुलनेत या बदली प्रक्रियेतील इच्छुकांची संख्या कमी असल्याने अडचणीही तुलनेने कमी असतात. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये राजकीय पदाधिकारी स्वारस्य दाखवित असल्याने प्रशासनाच्या दृष्टीने ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कसरतीचे काम असते.
जिल्ह्यात शिक्षकांची रिक्त पदे
शिक्षकांची बदली प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा दोन्ही प्रकारातील बदली होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे माहिती मागविणे सुुरु आहे. जिल्ह्यात मराठी माध्यमांच्या आंतर जिल्ह्यातील शिक्षकांचे 168 पदे रिक्त आहे. तर उर्दु माध्यमातील शिक्षकांचे 245 पदे रिक्त आहे. मराठी माध्यमातील अनुसुचित जाती 44, अनुसुचित जमाती 13, विजा.अ. 8, विजा.क.3, भ.ज.ब.9, वि.मा.प्र.9, इ.मा.व.25, खुला प्रवर्ग 65 पदे रिक्त आहे. उर्दु माध्यमातील अनुसुचित जाती 17, वि.जा.अ.7, विजा.ब.6, वि.मा.प्र.5, ओबीसी 46, खुला प्रवर्ग 150 जागा रिक्त आहे. आता पर्यत लेखी पध्दतीने 132 शिक्षकांनी अर्ज केले आहेत. तर उर्वरीत शिक्षकांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज केले आहे.