मुंबई | अवयवदानासंदर्भात लोकजागृती व्हावी आणि अवयवदान मोहिमेत जास्तीतजास्त लोकांचा सहभाग वाढावा यासाठी दरवर्षी 29 ऑगस्ट, हा दिवस “अवयवदान दिवस’’ म्हणून साजरा करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी जाहीर केले.
अवयवदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी आज मरीन ड्राईव्ह येथे सुमारे 22 हजार लोकांची दोन किलोमीटर लांबीची मानवी साखळी तयार करण्यात आली होती. गिरीश महाजन यात सहभागी झाले होते. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. अवयवदानसंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी राज्यपातळीवर अभियान हाती घेण्यात आले आहे. शहरांसोबतच गाव पातळीवर ही मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रत्येक गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून आज जे. जे. महाविद्यालय, ग्रॅन्ट रूग्णालय, खासगी तसेच शासकीय वैद्यकीय व्यवसायातील व्यक्ती, आय एम ए, सारख्या संस्था आणि इतर मान्यवरांची मानवी साखळी करण्यात आली होती.
अवयवदानात महाराष्ट्र आता देशात दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. यापूर्वी ते सहाव्या क्रमांकावर होते. याविषयी जनजागृती केल्यामुळे अवयवदात्यांची संख्या 41 वरून 131 पर्यंत गेली आहे. आजही नोंदणी केलेले सुमारे 12 हजार रूग्ण मूत्रपिंडांच्या प्रतिक्षेत आहेत. याशिवाय नोंदणी न झालेले आणि डायलेसीससारखे उपचार घेत जीवन जगणारे सुमारे 20 हजार रूग्ण अवयवदानाची प्रतीक्षा करीत आहेत. एखाद्या व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाल्यास त्याचे अवयवदान करण्यासाठी त्याच्या नातेवाईकांचे मन वळविणे, त्यांना अवयवदानाचे महत्त्व समजवून सांगणे हे काम डाक्टरांनी करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
चित्रप्रदर्शनीचे मंत्रालयात उद्घाटन
अवयवदानाचे महत्त्व चित्ररूपात कळावे यासाठी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात अवयवदान याविषयावरील चित्रांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात एकूण चौदा चित्र लावण्यात आली आहेत यात रुग्णाला अवयवदानाचे महत्व पटवून देणारे चित्र, नेत्रदानासंदर्भातील चित्र तसेच जिवंतपणी करता येण्यासारखे अवयवदान समजावून सांगणारे चित्र यासारखे अनेक चित्रे लावण्यात आली आहेत. या सुरेख चित्रांची संकल्पना आणि रेखाटन जे. जे. महाविद्यालयातील माजी विद्यार्थी सूरज कटारे यांनी केले आहे. हे चित्र प्रदर्शन दोन दिवस खुले राहणार आहे.