यावल- तालुक्यातील मानापुरी येथे एका 29 वर्षीय आदिवासी तरुण शेतकर्याने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. रेमा नानसिंग बारेला असे मृत शेतकर्याचे नाव आहे. यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे उत्पन्नाची हमी नसल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. आडगावपुढील श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिराच्या मार्गावर सातपुड्याच्या पायथ्याशी मनापुरी आदिवासी वस्ती आहे. येथील रहिवासी रेमा नानसिंग बारेला याने त्याच्यासह वडीलांच्या नावे ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतले होते. 15 दिवसांपूर्वीच त्यांनी ट्रॅक्टरचा 30 हजार रुपयांचा हप्ता भरला होता. उवर्रित 60 हजार रुपये भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. याच विवंचनेतून त्यांनी शुक्रवारी विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यांना जळगाव येथे दाखल केले असता उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परीवार आहे.