नवी दिल्ली : यंदा मान्सूनचे वेळेआधीच भारतात आगमन होणार आहे. केरळात मान्सून २९ मे रोजी धडकणार आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. दरवर्षी मान्सून केरळमध्ये 1 जूनला धडकतो. मात्र, यंदा तो तीन दिवस आधीच केरळात येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
येत्या तीन-चार दिवसात उत्तर आणि पश्चिम भारतात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून देशासह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
पाऊस सामान्य राहील
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पाऊस सामान्य राहील, अशी शक्यता व्यक्त केली होती. यंदा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता कमीच असल्याचं आयएमडीने म्हटले आहे. पावसाचे प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता साधारणत: ४२ टक्के असेल, असं हवामान खात्याने म्हटले आहे. तर पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता १२ टक्के असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दरम्यान, मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच बळीराजाचीही लगभग सुरु होणार आहे.
२४ तासानंतर महाराष्ट्रात
मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर पुढील २४ तासात त्याची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, केरळचा बराच परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडीचा परिसरात होते. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात 2 ते 3 जून रोजी पूर्व मोसमी पाऊस होण्याचा अंदाज गेल्यावर्षी वर्तवण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी मान्सून राज्यात कधी दाखल होतो, ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.