बोदवड। राज्य शासनाने कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवले आहे. त्यादृष्टीने मुक्ताईनगर वनक्षेत्रातील साळशिंगी रोपवाटिकेत तीन लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. तर पुढील वर्षासाठी तीन लाख रोपे तयार करण्याचे काम रोपवाटिकेत सुरू झाले आहे. वनविभागाच्या साळशिंगी रोपवाटिकेत बी पेरणीपासून ते रोपांची योग्य काळजी घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे सध्या लागवड करण्यात आलेली सर्व रोपे पाच फुटापर्यंत वाढली आहेत. त्यात कडूनिंब, सिसम, अंजन, पापडी, आवळा, खैर, सिरस, आमलतास, चिंच, बाभूळ, बांबू, कैट, बेल, बोल, बेहडा आणि कव्ह या प्रजातीच्या वृक्षांची रोपे तयार आहेत. यात अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या रोपांचाही समावेश आहे. यंदा शासकीय विभागांसह प्रत्येक ग्रामपंचायतीला 364 रोपे लावून ते जगवण्याचे उद्दीष्ट दिले जाणार आहे. या कामासाठी मुक्ताईनगरचे वनक्षेत्रपाल पी.टी.वराडे, वनपाल किशोर वराडे, वनरक्षक विकास पाटील यांच्यासह वनमजूर अशोक धांडे आदी परिश्रम घेत आहेत.
बोदवड तालुक्यातील हिरवळ आणखी वाढणार
रोपवाटिकेत असलेल्या कूपनलिका आणि विहिरीवरुन रोपांना पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी मुबलक साठा असल्याने उन्हाळ्यातही रोपे हिरवीगार आहेत. पावसाळ्यात विविध शाळा-महाविद्यालये, ग्रामपंचायती, विज वितरण, परिवहन महामंडळ, तहसील, पंचायत समितीसह अन्य शासकीय विभागांना वृक्षलागवडीचे उद्दीष्ट दिले जाते. त्यानुसार रोपांचे वितरण केले जाणार आहे. आगामी पावसाळ्यातील व्यापक प्रमाणात होणार्या वृक्षलागवडीमुळे अवर्षणग्रस्त बोदवड तालुक्यातील हिरवळ आणखी वाढणार आहे.
नागरिकांचे सहकार्य हवे
यावर्षी रोपवाटिकेत तीन लाख रोपे लागवडीसाठी तयार आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात विशेष मोहीम राबवून वृक्षलागवड केली जाणार आहे. या कामात नागरिकांचेदेखील सहकार्य अपेक्षित आहे. वृक्षलागवडीसाठी वनविभागाने तयारी पूर्ण केली असल्याचे वनपाल किशोर वराडे यांनी सांगितले. मुक्ताईनगर वनक्षेत्राअंतर्गत ’ग्रीन आर्मी’सदस्यांची नोंदणी केली जात आहे. आतापर्यंत या उपक्रमात सात हजार सदस्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आदी उपक्रमांबाबत जनजागृती करण्यासाठी ग्रीन आर्मीतील सदस्यांची मदत घेतली जाणार आहे. या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे.
16 मजूर कार्यरत
रोपवाटिकेत लावलेल्या रोपांची काळजी घेण्यासाठी 16 मजूर कार्यरत आहेत. त्यात 13 महिला आणि 3 पुरुष मजुरांचा समावेश आहे. रोपांना वेळच्या वेळी पाणी देणे. रोपांमधील तण काढणे, औषध फवारणी, उन्हापासून संरक्षण अशा प्रकारची कामे वनविभागाच्या मजुरांकडून करून घेतली जातात. दरम्यान, या रोपांची मजुरांकडून नियमितपणे निगा राखली जात असल्यामुळे रोपे वाढत आहे. याचा फायदा वृक्षारोपण करतांना होणार असून लावलेल्या रोपांची वाढ झपाट्याने होण्यास मदत होईल.