3 ऑक्टोंबरपासून विशेष मतदार नोंदणी मोहीम

0

जळगाव । जळगाव शहर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणुक सप्टेंबर 2018 मध्ये होणार आहे. या निवडणुकीकरिता मतदार यादी अद्यवायत करण्यात येत आहे. त्यासाठी 3 ऑक्टोंबर ते 3 नोव्हेंबर रोजी या कालावधीत विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्रात येणार असल्याची माहिती प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी दिली. जळगाव शहर महानगरपालिकेसह राज्यातील धुळे, अहमदनगर, सांगली-मिरज-कुपवाड या महानगरपालिकांच्या निवडणूका सप्टेंबर 2018 मध्ये होणार आहे. या निवडणुकांसाठी मतदार याद्या बिनचूक होण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारीया यांनी आज या महापालिकांच्या आयुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून करावयाच्या तयारीचा आढावा घेतला. या कॉन्फरन्ससाठी प्रभारी आयुक्त निंबाळकर यांच्यासह उपायुक्त चंद्रकांत खोसे, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

दुरूस्तीच्याही सूचना
मतदार नोंदणी मोहिमेसाठी बुथ लेव्हल ऑफिसर्सची (बी.एल.ओ) नियुक्ती करण्यात आली असून ते सर्व मतदारांच्या घरी येणार आहे. नागरीकांनी आपल्या घरातील सर्व पात्र मतदारांची नांवे मतदार यादीत समाविष्ट करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दि. 1 जानेवारी, 2018 रोजी वय 18 वर्षे पूर्ण होईल अशा सर्व मतदारांची नोंदणी आपल्याकडे येणार्‍रा बी. एल. ओ. मार्फत करुन घ्यावी. तसेच घरातील सर्व पात्र मतदारांची नावे विधानसभा मतदार यादीत आहे अथवा नाही याची खात्री करावी नसल्यास नावाची नोंदणी करावी. मतदार यादीतील नावात व पत्ता यामध्ये काही चुक असल्यास त्याची दुरुस्ती करावी. घरातील कोणी सदस्य मयत झालेले असल्यास त्यांचे नाव मतदार यादीतुन वगळून घ्यावे. होस्टेल, रेल्वे, सरकारी, खाजगी कंपनी निवासस्थानात व वसाहतीमध्ये तसेच खाजगी मिळकतीत पूर्वी राहत असलेले भाडेकरी आता घर सोडुन गेले आहेत यांची माहिती देऊन त्यांचे नांव मतदार यादीतून कमी करुन घ्यावे, असे आवाहन देखील प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी केले.