पुणे। शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त पुणे महापालिका आणि ढोल ताशा महासंघ यांच्यावतीने बालेवाडी येथे 27 ऑगस्टला विश्वविक्रमी ढोल वादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, गिनीज बुक ऑफ वर्ल्डची वेळ न मिळाल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी म्हणजे 3 सप्टेंबर रोजी हा उपक्रम करण्याच्या तयारीत महापालिका असून त्या संदर्भतील परवानगी गिनीज बुककडून मिळाल्याची माहिती महापालिका अधिकारी सुरेश जगताप यांनी दिली आहे.
पुण्यातील गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त पुणे महापालिका आणि ढोल ताशा महासंघ यांच्यावतीने विश्वविक्रमी ढोल करण्याचा उपक्रम सुरुवातीला एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्याचे ठरवले होते. मात्र, पोलिस आयुक्तांनी शांतता झोनचे कारण देऊन येथील वादनास परवानगी नाकारली होती. त्यानंतर बालेवाडी येथे वादन करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार, रविवारी बालेवाडी येथे शहरातील सर्व ढोल पथकातील 3 हजार 600 वादक एकत्र वादन करून या वादनाचा विश्वविक्रम करणार होते. यासाठी गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डकडे पाठपुरावाही सुरू होता. आता परवानगी मिळाल्याने 3 सप्टेंबर रोजी करण्याचे नियजोन केले जात आहे.