3 हजार नागरिकांनी घेतले आंतराष्ट्रीय वाहन परवाने

0

पुणे । परदेशात वास्तव्य करत असताना भारतीय नागरिकांना वाहन चालवण्यासाठी आंतराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज असते. परदेशात जाऊन राहणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी काही महिन्यांपूर्वी परिवहन कार्यालयाने आंतराष्ट्रीय वाहन परवाना मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली. यामुळे आंतराष्ट्रीय परवाना काढणार्‍यांना सोपे जात असून गेल्या वर्षभरात 3 हजार नागरिकांनी आंतराष्ट्रीय वाहन परवाने घेतले आहेत.

नोकरी, शिक्षणासाठी परदेशात राहणार्‍यांची संख्या मोठी आहे. यासाठी देशातील ज्या ठिकाणी तो राहायला आहे, तेथील आरटीओकडून त्याला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढावा लागतो. अशा प्रकारे 2017-18 वर्षभरात 2,999 नागरिकांनी तर 2016-17 साली 3441 नागरिकांनी आंतराष्ट्रीय वाहन परवाना घेतला आहे. अगोदर ही प्रक्रिया मॅन्युअल होती. मात्र, काही महिन्यांपूर्वीत ती ऑनलाइन करण्यात आली. यासाठी परिवहन मंत्रालयाच्या वेबसाइटवरुन ‘सारथी’अंतर्गत ऑनलाइन अर्ज करावा लागतो. याठिकाणी कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी लागतात. या परवान्यासाठी संबंधित अर्जदाराकडे वाहन परवाना असल्यास पुन्हा वाहन चालवणे तसेच परीक्षा देण्याची गरज लागत नाही. मात्र, त्यांचे सध्याचे ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट व व्हिसा याची पडताळणी केली जाते. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला मूळ कागदपत्रे घेऊन पडताळणीसाठी आरटीओत जावे लागते. यानंतर कागदपत्रांची तपासणी करुन आरटीओतून त्याला एका दिवसात आंतराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो.

असा काढा परवाना
परिवहन मंत्रालयाने सुरू केलेल्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करुन त्यासाठी कागदपत्रे, फोटो अपलोड करा. यानंतर त्या अर्जाची मूळ कागदपत्रांसह आरटीओकडून पडताळणी केली जाते. यात सध्याचा वाहन परवाना, 1 हजार रुपये शुल्क, पासपोर्ट, व्हिजा आदी मूळ कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर आरटीओकडून संबंधिताला एक दिवासात आंतराष्ट्रीय वाहन परवाना वितरीत केला जातो. मात्र, हा परवाना फक्त वर्षभरासाठी वैध असून पुढील वर्षासाठी पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागते.